Spread the love

श्री मनूदेवी माता मंदिरात धाडसी चोरी; १ लाख ३५ हजारांचे चांदीचे मुकुट व छत्र्या लंपास

गाभाऱ्यातून दागिने गायब; श्वानपथक व फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू

यावल | प्रतिनिधी : हर्षल पाटील

यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या प्रसिद्ध श्री मनूदेवी माता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून देवीच्या मूर्तीवरील सुमारे १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे चांदीचे मुकुट व छत्र्या लंपास केल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरी

मंदिर परिसरातील सामसूम आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर गाभाऱ्यातील चांदीचे मुकुट तसेच पूजाविधीसाठी वापरल्या जाणाऱ्या छत्र्या चोरून नेल्याचे समोर आले आहे.

सकाळी पूजाविधीवेळी प्रकार उघडकीस

सकाळी मंदिराचे पुजारी व विश्वस्त पूजाविधीसाठी मंदिरात गेले असता गाभाऱ्यातील चांदीचे दागिने व छत्र्या गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांना तसेच यावल पोलिसांना माहिती दिली.

श्वानपथक व फॉरेन्सिक पथकाकडून तपास

घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली असून श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकाची मदत घेण्यात येत आहे. मंदिर परिसर तसेच आसपासच्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मंदिर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

श्री मनूदेवी माता मंदिर हे परिसरातील प्रमुख श्रद्धास्थान असून येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अशा ठिकाणी चोरीची घटना घडल्याने मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाविक आणि मंदिर विश्वस्तांकडून होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version