Spread the love

जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात महापुरुषांना अभिवादन

धुळे जिल्ह्यातील २२ शासकीय व ४१ अनुदानित आश्रमशाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

धुळे | प्रतिनिधी :

जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धुळे यांच्या वतीने आदिवासी महापुरुषांसह विविध महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. देव मोगरा देवीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी आदिवासी गीतांवर नृत्य सादर करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. तसेच महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालय परिसरात आकर्षक रांगोळी काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

आश्रमशाळांमध्येही विविध उपक्रम

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून धुळे जिल्ह्यातील २२ शासकीय आश्रमशाळा आणि ४१ अनुदानित आश्रमशाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी दिली.

आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रकल्प अधिकाऱ्यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन केले. यावेळी आदिवासी क्रांतिकारकांच्या जयघोषाने कार्यालय परिसर दुमदुमून गेला. उत्साहपूर्ण वातावरणात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी दशरथ शिंदे, पवन सुनोने, लेखा अधिकारी राजेश देशमुख, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शामकांत पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी बी. ए. आव्हाड, कार्यालय अधीक्षक आर. पी. मोरे, महेंद्र देवरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version