Spread the love

‘उपवर्गीकरण हे सत्ताधारी आणि न्यायपालिकेचे षडयंत्र’ — मुकुंद सपकाळे

उपवर्गीकरणाविरोधात लोकसंघर्ष समितीचा एल्गार; सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात भव्य मोर्चाचे नियोजन

जगदिश सपकाळे जळगाव | प्रतिनिधी : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. “उपवर्गीकरण हे सत्ताधारी आणि न्यायपालिकेचे षडयंत्र आहे,” असा आरोप अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी लोकसंघर्ष समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केला.

शानबाग सभागृहात समितीच्या वतीने आयोजित मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जाती-जातींत, धर्मा-धर्मांत आणि माणसा-माणसांत तेढ निर्माण करून देशाला अस्थिर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

‘पुढील पिढ्यांचे भविष्य अंधकारमय करण्याचा प्रयत्न’

प्रशासन यंत्रणेचा वापर करून सामाजिक विषमता वाढविणारी परिस्थिती निर्माण केली जात असल्याचा दावा सपकाळे यांनी केला. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींच्या सामाजिक आणि राजकीय एकतेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

“सध्याची परिस्थिती पुढील अनेक पिढ्यांना अंधकारमय जीवनाकडे ढकलण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्याची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोर्चाचे नियोजन

उपवर्गीकरणाच्या विरोधात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भव्य मोर्चा काढण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. या मोर्चाला विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

यामध्ये आनंदराज आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे, बबनराव घोलप, खासदार चंद्रकांत हंडोरे आणि दीपक केदार यांची उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. मोर्चाच्या नियोजनासाठी तालुकानिहाय बैठका घेण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.

विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मेळाव्यास आरपीआय (आठवले गट)चे राजूभाऊ सूर्यवंशी, संविधान आर्मीचे जगनभाऊ सोनवणे, राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, भीमशक्तीचे अध्यक्ष सुधीर जंजाळे, शिवसेना (शिंदे गट) मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष मुकुंद नन्नवरे, चर्मकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग बाविस्कर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू मोरे, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळा पवार, समता सैनिक दलाचे विजय निकम, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष लखन पानपाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

चर्मकार महिला आघाडीच्या अध्यक्षा भारती बाविस्कर, जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष सुरेश तायडे, साहेबराव वानखेडे, प्रा. किसन हिरोळे, डॉ. प्रकाश वानखेडे, ईश्वर अहिरे, मागासवर्गीय रेल्वे कामगार युनियनचे सुनील दाभाडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मेळाव्यास मार्गदर्शन केले.

जिल्हाभरातून कार्यकर्त्यांचा सहभाग

मेळाव्यास चेतन नन्नवरे, चंद्रगुप्त सुरवाडे, महिंद्र केदार, दत्तू सोनवणे, संतोष गायकवाड, श्रीकांत बाविस्कर, सोमा भालेराव, यशवंत बैसाणे, गोविंद पवार, जयपाल धुरंदर, सुनील विसावे, वसंत नेटके, यशवंत घोडेस्वार, प्रमोद इंगळे, भगवान बाविस्कर, दिलीप सपकाळे, ज्योती भालेराव, कविता सपकाळे, अजय बिऱ्हाडे, सचिन वानखेडे, जितू केदार, अनिकेत ब्राह्मणे, ईश्वर रंधे, प्रवीण परदेशी, सुभाष मोरे, जावेद शेख, इरफान शेख, भैय्या सपकाळे, रमाकांत इंगळे, अक्षय वाघ यांच्यासह जिल्हाभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकांद्वारे मोर्चाच्या तयारीला वेग

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रीतीलाल पवार यांनी केले. प्रास्ताविक प्रा. किसन हिरोळे, तर आभार संध्या तायडे यांनी मानले.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय बैठका घेऊन जनजागृती आणि संघटनात्मक नियोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर विविध संघटनांना एकत्र आणून आंदोलन व्यापक करण्याचा निर्धार मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version