शहीदांच्या स्मृती जपणारा जळगावचा ‘शौर्य पॅटर्न’; २९ गावांत उभारणार प्रेरणास्थळे
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शहीद कुटुंबीयांचा सन्मान करताना भावनिक उद्गार काढले. “देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. त्यांच्या त्यागाची स्मृती जपणे आणि भावी पिढीसमोर त्यांचे शौर्य जिवंत ठेवणे, हीच शहीदांना खरी मानवंदना आहे. शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा आहे,” असे त्यांनी सांगितले.
२९ वीरभूमींची माती एकत्र
या उपक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे ज्या २९ गावांमध्ये शहीद स्मारके उभारण्यात येणार आहेत, त्या प्रत्येक गावातून आणलेली माती स्वतंत्र कलशांमध्ये ठेवण्यात आली होती. त्यानंतर या २९ वीरभूमींची माती एकत्र करण्यात आली. त्यामुळे विविध गावांतील शौर्य, त्याग आणि राष्ट्रप्रेम एका प्रतीकात्मक सूत्रात बांधले गेले.
शहीद स्मारके केवळ वास्तू न राहता विद्यार्थ्यांना इतिहासाची ओळख करून देणारी आणि तरुणांना देशसेवेची प्रेरणा देणारी केंद्रे ठरावीत, असा या उपक्रमामागील उद्देश आहे. स्मारकांच्या देखभाल-दुरुस्तीचे नियोजन ग्रामपंचायतींच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
वीर परिवारांना अग्रस्थान
कार्यक्रमाची सुरुवात पोलीस बँडच्या संचलनाने झाली. अग्रभागी वीर माता, वीर पिता, वीर पत्नी आणि शहीद जवानांचे कुटुंबीय, तर त्यांच्या मागे पालकमंत्री, मंत्री, आमदार व लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. या वेळी शहीदांच्या स्मृतींना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शहीद कुटुंबीयांना पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते सूती तिरंगा हार व शाल देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमातील या क्षणांनी उपस्थितांचे वातावरण भावूक झाले.
“देशसेवेची भावना नव्या पिढीत रुजेल”
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी शहीद जवानांच्या बलिदानामुळे देश सुरक्षित असल्याचे सांगत, त्यांच्या स्मृतींमधून नव्या पिढीला देशसेवेची प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
आमदार राजू मामा भोळे यांनी शहीद कुटुंबीयांच्या पाठीशी शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. तर आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा-भडगाव परिसरातील शहीद जवानांच्या योगदानाचा उल्लेख करत शहीद स्मारकांच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती चिरंतन होणार असल्याचे नमूद केले.
३२ शहीदांच्या शौर्यगाथेचा माहितीपट
क्रांतिदिनाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील ३२ शहीद जवानांच्या शौर्य, त्याग आणि देशसेवेवर आधारित माहितीपट यावेळी प्रदर्शित करण्यात आला. पडद्यावर शहीद जवानांच्या शौर्यगाथा उलगडत असताना वीर माता-पिता, वीर पत्नी आणि उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमानासोबत अश्रूही तरळले.
या वेळी पालकमंत्र्यांनी शहीद कुटुंबीयांच्या त्यागाचा उल्लेख करत “तिरंगे में लिपटा बेटा…” या भावनिक ओळींचा संदर्भ दिल्याने सभागृहातील वातावरण अधिकच भारावून गेले.
‘जळगाव पॅटर्न’ ठरणार प्रेरणादायी
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी २९ गावांमध्ये शहीद स्मारके उभारण्याचा हा उपक्रम भावी पिढीला संरक्षण, देशसेवा आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा ठरेल, असे सांगितले. शहीदांच्या गावात उभी राहणारी ही प्रेरणास्थळे राज्यासाठी आदर्श ठरावीत, या भावनेतून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.
कार्यक्रमास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, कर्नल मल्होत्रा, परिवर्तन संस्थेचे प्रमुख शंभू पाटील, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी, वीर माता-पिता, वीर पत्नी, शहीद कुटुंबीय व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.
