Spread the love

रावेरमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा जल्लोष;

पारंपरिक वेशभूषेतील भव्य मिरवणुकीने वेधले लक्ष

रावेर | प्रतिनिधी – प्रदीप खैरे

रावेर शहरात ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. आदिवासी एकता परिषद, अखिल भारतीय विकास परिषद, तडवी कॉलनी, जीएस कॉलनी तसेच रावेर तालुक्यातील आदिवासी समाजबांधवांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.

तडवी कॉलनी येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. तालुक्यातील विविध गावांतून आलेल्या आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिला व पुरुषांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. महिलांच्या हातातील धनुष्यबाण व भाल्यांसह पारंपरिक वेशभूषेने मिरवणुकीचे विशेष आकर्षण वाढविले.

बिरसा मुंडा, टंट्या मामांची वेशभूषा ठरली आकर्षण

मिरवणुकीतील क्रांतिसूर्य बिरसा मुंडा आणि क्रांतिवीर टंट्या मामा यांच्या साकारलेल्या रूपांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. बिरसा मुंडा यांच्या वेशभूषेतील व्यक्तीने हातात भाला घेऊन घोड्यावर स्वार होत सहभाग नोंदविला. तसेच टंट्या मामांच्या वेशभूषेतील व्यक्तीने हातात बंदूक घेऊन घोड्यावरून मिरवणुकीत सहभाग घेतला.

आंबेडकर चौकात अभिवादन

‘जय आदिवासी, जय मूलनिवासी’ अशा घोषणांनी मिरवणूक तडवी कॉलनीतून शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ‘संविधान जिंदाबाद’, ‘जय भीम’ यांसह विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

कार्यक्रमाला आदिवासी समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा सचिव बी. आर. तडवी, तालुका उपाध्यक्ष गुलाब तडवी, आदिवासी विकास परिषदेचे राज्य उपाध्यक्ष रोनक तडवी, ॲड. सलीम तडवी, सरफराज तडवी, अनिल बारेला, नसीर तडवी, गुरू बारेला, जितु सोलंकी, प्रकाश सोनवणे, संजय गायकवाड यांच्यासह अनेक समाजबांधव सहभागी झाले.

जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आयोजित या मिरवणुकीतून आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा संदेश देण्यात आला. पारंपरिक वेशभूषा आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे रावेर शहरात दिवसभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version