रावेरमध्ये जागतिक आदिवासी दिवस उत्साहात; भव्य मिरवणुकीतून संस्कृतीचे दर्शन
पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक सादरीकरण अन् पारंपरिक वाद्यांचा गजर; महिला, युवक, विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
रावेर | प्रतिनिधी – जयेश बिरपण : जागतिक आदिवासी दिनानिमित्त रावेर शहरात आदिवासी समाजाच्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचे दर्शन घडवत भव्य मिरवणूक व विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. मिरवणुकीत आदिवासी बांधवांसह महिला, युवक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
मिरवणुकीत सहभागी झालेल्या समाजबांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. विविध सांस्कृतिक सादरीकरणे, घोडेस्वार तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरामुळे संपूर्ण रावेर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
पारंपरिक नृत्याने रंगला सोहळा
महिला आणि युवकांनी पारंपरिक नृत्य सादर करत मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आदिवासी समाजाची लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
जागतिक आदिवासी दिवस हा केवळ उत्सवाचा दिवस नसून आदिवासी समाजाची अस्मिता, संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचा दिवस असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. विविध सांस्कृतिक उपक्रमांमुळे रावेर शहरात आदिवासी संस्कृतीचा उत्साहपूर्ण जागर पाहायला मिळाला.
