‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत महात्मा फुले हायस्कूलमध्ये वृक्षारोपण
सामाजिक वनीकरण विभागाकडून १०० वृक्षांची रोपे भेट; शिक्षक-विद्यार्थ्यांनी घेतला वृक्षसंवर्धनाचा संकल्प
धरणगाव प्रतिनिधी :
‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत धरणगाव शहरातील महात्मा फुले हायस्कूल येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक वनीकरण विभाग, धरणगावच्या वतीने शाळेला विविध प्रजातींची १०० वृक्षांची रोपे भेट देण्यात आली.
सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी. बी. सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आर. यू. घोडे, एन. एन. शिरसागर तसेच वनरक्षक एस. आय. शिंदे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर वनपाल आर. यू. घोडे यांच्या हस्ते शाळेतील उपशिक्षक पी. डी. पाटील व एच. डी. माळी यांच्याकडे वृक्षांची रोपे सुपूर्द करण्यात आली.
यानंतर शाळेच्या परिसरात शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते नीम, वड, पिंपळ यांसह विविध वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाबरोबरच विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनाची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी वनपाल आर. यू. घोडे म्हणाले की, सध्याच्या काळात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ वृक्षलागवड करून उपयोग नाही, तर लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करून ते जगविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजावून सांगितले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची भावना निर्माण होऊन शाळेच्या परिसरात हिरवाई वाढण्यास मदत होणार आहे. वृक्षारोपण कार्यक्रमात शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. डी. पाटील यांनी केले, तर एच. डी. माळी यांनी आभार मानले.
