कष्टकरी कुटुंबातील भगवान नन्नवरे यांना वकिलीची सनद; मुंबई कोर्टात करणार वकिली
शिक्षण, जिद्द आणि संघर्षाच्या जोरावर यश; सतखेडा गावच्या सुपुत्राचा प्रेरणादायी प्रवास
सतखेडा प्रतिनिधी :
कष्टकरी कुटुंबातील युवकाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाच्या जोरावर मिळवलेल्या यशामुळे सतखेडा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भगवान अंकुश नन्नवरे यांनी मेहनत, जिद्द आणि संघर्षाच्या बळावर वकिलीचे शिक्षण पूर्ण करून वकिलीची सनद प्राप्त केली असून, आता ते मुंबई कोर्टात वकील म्हणून कार्यरत होणार आहेत. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भगवान नन्नवरे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरणास्थान मानत शिक्षण आणि संघर्षाचा मार्ग स्वीकारला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या विचारांना आपल्या जीवनात उतरवत त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण पूर्ण केले.
भगवान यांचे वडील अंकुश नाना नन्नवरे यांनी हातमजुरी व मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही मुलाच्या शिक्षणाला त्यांनी प्रोत्साहन दिले. स्वतःच्या कष्टावर शिक्षण पूर्ण करत भगवान यांनी ‘स्वतः कमवा आणि स्वतः शिका’ या विचारातून आपली वाटचाल सुरू ठेवली.
परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या माध्यमातून ध्येय गाठता येते, हे भगवान नन्नवरे यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. एका सामान्य कष्टकरी कुटुंबातील मुलाने मुंबई कोर्टात वकील म्हणून प्रवेश मिळवणे ही त्यांच्या परिवारासोबतच संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
भगवान यांच्या यशामुळे सतखेडा ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या यशाकडे गावातील युवकांसाठी प्रेरणादायी उदाहरण म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या यशाने वडील अंकुश नाना यांच्या कष्टाचेही सार्थक झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
भगवान नन्नवरे यांना वकिलीची सनद मिळाल्याबद्दल ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या हातून गोरगरीब, कष्टकरी आणि गरजू नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य घडावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
शिक्षणाची वाट, संघर्षाची साथ आणि बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मुंबई कोर्टात वाटचाल करणाऱ्या सतखेडा गावच्या या सुपुत्राचे यश निश्चितच तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
