Spread the love

जळगाव विमानतळाच्या विकासाला गती द्या

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाहीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

पारोळा/सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) :
जळगाव विमानतळ विकास व विस्तारीकरण प्रकल्पातील प्रलंबित प्रश्न, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच परिसरातील विविध विकासकामांचा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला.

विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली जमीन मोजणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार मिळणारे लाभ वेळेत देण्यात यावेत, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे बाधित होणारे रस्ते तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी आवश्यक असलेले स्वतंत्र प्रवेशमार्ग उपलब्ध करून देण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

चिंचोली–नशिराबाद–उमाळा रस्त्याचे काम प्रगतिपथावर

चिंचोली–नशिराबाद–उमाळा कच्च्या वहिवाट रस्त्याच्या डांबरीकरणासह पुलाच्या बांधकामाचा आढावाही यावेळी घेण्यात आला. सदर काम प्रगतिपथावर असून, उर्वरित काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या.

अजिंठा चौफुली ते विमानतळ सौर पथदिवे

जळगाव विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गाच्या सौंदर्यीकरणासोबतच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अजिंठा चौफुली ते विमानतळ या मार्गावर सौर पथदिवे उभारण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरील प्रकाशव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

विकासाच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या हक्कांशी कोणतीही तडजोड होणार नाही. विमानतळाचा विकास आणि शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण या दोन्ही बाबी समन्वयाने साध्य कराव्यात,” अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत मांडली.

विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाला गती देतानाच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश देण्यात आल्याने या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version