हिंदू युवा सेनेच्या आंदोलनानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर; जेल रोडवरील अतिक्रमणे जमीनदोस्त
अतिक्रमणाला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; आंदोलनासाठी पर्यायी जागेच्या मागणीवर आनंद लोंढे ठाम
धुळे (प्रतिनिधी) :
हिंदू युवा सेनेने जेल रोडवरील अतिक्रमणांविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर धुळे महानगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने पोलिस बंदोबस्तासह जेल रोडवर कारवाई करत विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी उभारलेली अतिक्रमणे हटविली. या कारवाईदरम्यान अतिक्रमण हटविण्यास विरोध करणाऱ्या संविधान सेनेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात नेले.
हिंदू युवा सेनेच्या आंदोलनाला यश आल्याचा दावा
पाच कंदील मार्केट हटविल्यानंतर तेथील व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने जेल रोड परिसरात पर्यायी जागा उपलब्ध करून दिली होती. मात्र, कालांतराने या जागेवर विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालये व इतर स्वरूपाचे अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला.
या अतिक्रमणांविरोधात हिंदू युवा सेनेने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला दोन दिवसांत अतिक्रमणे हटविण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात कारवाई करत जेल रोडवरील अतिक्रमणे हटविली.
विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला काही कार्यकर्त्यांनी विरोध केला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी विरोध करणाऱ्या संविधान सेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना पुढील कार्यवाहीसाठी शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
कारवाईदरम्यान काही किरकोळ वाद झाले असले तरी सध्या परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे.
आनंद लोंढे पर्यायी जागेच्या मागणीवर ठाम
दरम्यान, आंदोलन सुरू असताना प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना हटविल्याबाबत आनंद लोंढे यांनी प्रश्न उपस्थित केला. “उपोषण सुरू असताना कुठल्या कायद्यान्वये आम्हाला हटवले?” असा सवाल करत त्यांनी आंदोलनासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी कायम ठेवली आहे.
लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासाठी प्रशासनाने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीवर आनंद लोंढे ठाम असल्याचे दिसून आले.
भगवा चौकातील कार्यालयावरही कारवाईची मागणी
जेल रोडवरील अतिक्रमणे हटविल्यानंतर हिंदू युवा सेनेने प्रशासनाचे आभार मानले. तसेच भगवा चौकातील उबाठा कार्यालयावरही अतिक्रमण असल्यास ते हटविण्याची कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
जेल रोडवरील कारवाईमुळे परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या या कारवाईनंतर पुढील काळात शहरातील इतर प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणांवरही कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
