Spread the love

आयुष्यमान आरोग्य मंदिरातील डॉक्टरांविरोधात युवासेनेची तक्रार; स्वतंत्र चौकशीची मागणी

हिंदू कर्मचाऱ्यांबाबत भेदभाव व अपमानास्पद वर्तनाचे आरोप; चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची मागणी

धुळे (प्रतिनिधी) :
धुळे महानगरपालिकेच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर (HWC), सुलतानिया मदरसा येथील डॉ. सीमा मुजावर यांच्यावर हिंदू कर्मचाऱ्यांबाबत भेदभावपूर्ण व अपमानास्पद वर्तन केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची तातडीने स्वतंत्र चौकशी करून उपलब्ध पुराव्यांची सखोल तपासणी करावी, अशी मागणी युवासेना धुळे जिल्ह्याच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

युवासेना धुळे जिल्हाध्यक्ष योगेश राजेंद्र मराठे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात या प्रकरणाचा उल्लेख केला आहे. तक्रारीनुसार, उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत असलेल्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये कर्मचाऱ्याच्या धार्मिक ओळखीचा उल्लेख करून कथित भेदभावपूर्ण संवाद झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

स्वतंत्र चौकशीची मागणी

या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर संबंधित कॉल रेकॉर्डिंगसह उपलब्ध सर्व पुराव्यांची तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर पडताळणी करण्यात यावी, तसेच संबंधित कर्मचारी व इतर व्यक्तींचे जबाब नोंदवून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे.

चौकशी पूर्ण होईपर्यंत डॉ. सीमा मुजावर यांना तात्पुरते निलंबित करावे आणि चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास नियमानुसार कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

महापालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

या आरोपांबाबत संबंधित डॉक्टरांची किंवा महापालिका प्रशासनाची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे तक्रारीतील आरोपांची सत्यता स्वतंत्र चौकशीत स्पष्ट होणे अपेक्षित आहे. प्रकरणाची प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि चौकशी कशा पद्धतीने केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version