Spread the love

तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न शाळेसाठी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी

बोदवडमधील सर सत्यजित राम नेमाडे विद्यालयात तंबाखूमुक्त अभियानाचे उद्घाटन; जनजागृतीपर घोषणांनी शहर दुमदुमले

बोदवड (प्रतिनिधी) :
बोदवड येथील सर सत्यजित राम नेमाडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी तंबाखूमुक्त अभियानाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू सेवन व विविध प्रकारच्या व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनंतराव कुलकर्णी होते. बोदवड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष लव्हंगडे यांच्या हस्ते तंबाखूमुक्त अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोदवड पोलिस ठाण्याच्या पीएसआय स्वाती एडके, सामाजिक वनीकरण विभागाचे आरएफओ सौरव पाटील, बोदवड नगरपालिकेचे सीईओ सतीश पुदाके, माजी नगराध्यक्ष सईद बागवान, न. ह. रांका हायस्कूलचे एनसीसी प्रमुख सावळे सर, तंबाखूमुक्त अभियानाचे तालुका समन्वयक तथा रेणुका माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक मराठे सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. जी. हजारी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन

मान्यवरांचे स्वागत केल्यानंतर पोलीस निरीक्षक आशिष लव्हंगडे यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू तसेच विविध प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. व्यसनाधीनतेमुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. निरोगी जीवनशैली स्वीकारून व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

प्रभातफेरीतून तंबाखूमुक्तीचा संदेश

अभियानाच्या उद्घाटनानंतर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी शहरातून प्रभातफेरी काढली. विद्यार्थ्यांनी विविध जनजागृतीपर घोषणा देत नागरिकांना तंबाखू व व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. प्रभातफेरीमुळे शहरात तंबाखूमुक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमर सुनगत यांनी केले. अभियान यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version