Spread the love

मलोणी येथे नवनाथ महिला ग्रामसंघाच्या बैठकीत कृषी विभागाच्या विविध योजनांवर मार्गदर्शन

महिला बचत गटांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन; कृषी सहाय्यक गौतम खेडकर यांचे सविस्तर मार्गदर्शन

शहादा प्रतिनिधी :
उमेद अभियानाअंतर्गत दिव्यशक्ती महिला प्रभाग संघातील नवनाथ महिला ग्रामसंघाची मासिक बैठक नियमानुसार मलोणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उत्साहात पार पडली. या बैठकीमध्ये कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देत शेतकरी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.

मलोणी गावातील अनेक महिला बचत गटांच्या माध्यमातून जोडल्या गेल्या असून, त्यांना कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, या उद्देशाने तालुका व्यवस्थापक ईश्वर जगदाळे व प्रभाग समन्वयक सुचिता सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ महिला ग्रामसंघातर्फे तालुका कृषी विभागातील कृषी सहाय्यक गौतम खेडकर यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.

बैठकीची सुरुवात नियमानुसार ग्रामसंघ प्रार्थना,उपस्थितांचा परिचय,मागील सभेचे इतिवृत्त वाचन आणि या महिन्यातील आर्थिक व्यवहारांचा आढावा व निर्णय घेतल्यानंतर तालुका कृषी विभागातील आलेले कृषी सहाय्यक गौतम खेडकर यांनी आपला परिचय देऊन कृषी विभागाच्या विविध योजनांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

यामध्ये प्रामुख्याने:
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना,
महाडीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना,
ठिबक व तुषार सिंचन योजना,शेतकरी गटांसाठी कृषी अवजारे बँक योजना,
यांसह शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभाच्या ठरणार्या अनेक योजनांची सविस्तर माहिती देऊन योजनाचा लाभ घ्यावा असे कृषी सहाय्यक गौतम खेडकर यांनी सांगितले. यावेळी शेतकरी महिलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे व शंकांचे कृषी सहाय्यकांनी समाधानकारक निरसन केले.

आज
मिळालेली माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचावी यासाठी ग्रामसंघातील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आपापल्या बचत गटांतील इतर महिलांना या योजनांची माहिती देण्याचे सर्वानुमते ठरवले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी सहाय्यकांचे आभार मानले. या बैठकीला ग्रामसंघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि आय.सी.आर.पी. शितल मोहिते यांच्यासह विविध गटांतील महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.

Share.
Leave A Reply

Exit mobile version