टाटा मोटर्सच्या भारतातील पहिल्या बॅटरी इलेक्ट्रिक ट्रक श्रेणीचे अनावरण; महाराष्ट्राने दाखवली हरित वाहतुकीची दिशा
७ ते ५५ टन क्षमतेच्या इलेक्ट्रिक ट्रक्सची श्रेणी; ‘मेक इन इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’चे उत्तम उदाहरण – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई/पुणे | प्रतिनिधी : हर्षल पाटील :
भारताच्या हरित आणि शाश्वत वाहतूक क्षेत्रात महत्त्वाची भर पडली असून, Tata Motorsच्या ७ ते ५५ टन क्षमतेच्या बॅटरी इलेक्ट्रिक ट्रक्सच्या श्रेणीचे अनावरण राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, हा केवळ नवीन इलेक्ट्रिक ट्रक्सच्या अनावरणाचा कार्यक्रम नसून भारताच्या हरित आणि शाश्वत वाहतूक क्रांतीतील महत्त्वाचा टप्पा आहे. बॅटरी आणि इलेक्ट्रिक ट्रक्ससाठी स्वतंत्र धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’चे उदाहरण
या इलेक्ट्रिक ट्रक्सची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांची पुण्यात भारतीय अभियंत्यांकडून रचना व विकास करण्यात आला आहे. भारतीय कौशल्य, आधुनिक तंत्रज्ञान आणि देशांतर्गत उत्पादनक्षमता यांचा प्रभाव या वाहनांमधून दिसून येतो.
“हे इलेक्ट्रिक ट्रक म्हणजे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांचे उत्तम उदाहरण आहे. भारतीय अभियंत्यांची क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञानाची ताकद यामुळे अशा प्रकारची वाहने देशात विकसित होत आहेत,” असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
EV उद्योगासाठी महाराष्ट्रात अनुकूल वातावरण
महाराष्ट्र शासनाने राज्यात इलेक्ट्रिक वाहन उद्योगाच्या विकासासाठी अनुकूल धोरणात्मक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला आहे. EV धोरणामुळे वाहन उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रोत्साहन मिळत असून उद्योग आणि वाहतूक क्षेत्रासाठी नव्या संधी उपलब्ध होत आहेत.
७ ते ५५ टन क्षमतेच्या अवजड इलेक्ट्रिक ट्रक्सच्या या श्रेणीमुळे देशातील मालवाहतूक क्षेत्राला पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होणार आहे. पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासोबतच प्रदूषणात घट आणि इंधन खर्चात बचत होण्यास या तंत्रज्ञानाची मदत होण्याची अपेक्षा आहे.
हरित वाहतुकीच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल
इलेक्ट्रिक अवजड वाहनांच्या क्षेत्रातील या विकासामुळे मालवाहतूक क्षेत्राचे विद्युतीकरण वेगाने होण्यास चालना मिळण्याची शक्यता आहे. शाश्वत वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने महाराष्ट्राने घेतलेला हा पुढाकार महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
