प्रसारित ऑडिओ क्लिपमुळे मनपाच्या डॉक्टर अडचणीत; कारवाईच्या मागणीसाठी युवासेना आक्रमक
दोन समाजांत तेढ निर्माण करणाऱ्या कथित संभाषणाचा आरोप; दोन दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
धुळे | प्रतिनिधी : प्रसारित झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे धुळे महानगरपालिकेतील महिला डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये दोन समाजांत तेढ निर्माण होईल, अशा स्वरूपाचे संभाषण असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. संबंधित डॉक्टरांवर तातडीने कारवाई करून त्यांना निलंबित करावे तसेच गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी युवासेनेने मनपा प्रशासनाकडे निवेदन दिले आहे.
धुळे महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या एका रुग्णालयातील महिला डॉक्टरांनी कर्मचाऱ्याशी भ्रमणध्वनीवरून केलेल्या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप प्रसारित झाल्यानंतर हा प्रकार समोर आल्याचे युवासेनेचे म्हणणे आहे. या संभाषणामुळे दोन समाजांत तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप करत युवासेनेने संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे.
युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित ऑडिओ क्लिप मनपा आयुक्तांकडे सादर करून डॉ. सीमा मुजावर यांचे तात्काळ निलंबन करावे आणि चौकशी करून दोष आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच दोन दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे.
ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्याची मागणी
दरम्यान, प्रसारित ऑडिओ क्लिपची सत्यता, संभाषणाचा संदर्भ आणि त्यामागील वस्तुस्थिती यांची अधिकृत चौकशी होणे आवश्यक असल्याचेही या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट होत आहे. प्रशासनाच्या चौकशीनंतरच आरोपांमागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
युवासेनेचे पदाधिकारी आक्रमक
हे निवेदन युवासेनेचे उत्तर महाराष्ट्र सचिव अविष्कार भुसे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना जिल्हाप्रमुख योगेश मराठे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी शहरप्रमुख अमित खंडेलवाल, अनिल ठाकूर, चेतन धामेच्या, नितीन धनगर, सुमित चौधरी, तुषार सातपुते, सागर पाटील, राहुल ठाकूर, प्रीतम धात्रक, प्रवीण मराठे, शुभम पाटील, दिगंबर कासार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
युवासेनेच्या या मागणीवर मनपा प्रशासन काय भूमिका घेते आणि कथित ऑडिओ क्लिपच्या चौकशीतून नेमके काय समोर येते, याकडे आता लक्ष लागले आहे.
