Spread the love

TET उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे पवित्र पोर्टलवर समाविष्ट करा; शुभांगी पाटील यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

२०२४-२५ नंतर TET उत्तीर्ण D.Ed.-B.Ed. उमेदवारांना शिक्षक भरतीत संधी देण्याची मागणी; शिक्षणमंत्र्यांकडून प्रधान सचिवांना निर्देश

धुळे | प्रतिनिधी :
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत पात्र असूनही पवित्र पोर्टलवर नाव समाविष्ट नसल्यामुळे नोकरीच्या संधीपासून वंचित राहणाऱ्या २०२४-२५ नंतर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण D.Ed.-B.Ed. उमेदवारांना दिलासा देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेनेच्या राज्य उपनेत्या तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी पाटील यांनी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यात शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने पवित्र पोर्टल प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमध्ये सन २०२४ पर्यंत TET उत्तीर्ण झालेल्या D.Ed. व B.Ed. पात्रताधारक उमेदवारांची नावे समाविष्ट करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर TET परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नावे पवित्र पोर्टलमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

टॅब बंद असल्याने उमेदवार अडचणीत

२०२४-२५ नंतर TET उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पवित्र पोर्टलवर समाविष्ट करण्यासाठी उपलब्ध असलेला टॅब बंद असल्याने पात्र उमेदवारांना शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होता येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सध्या शासनाच्या विविध विभागांसह खासगी संस्थांच्या शिक्षक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. मात्र पवित्र पोर्टलवर नावे नसल्यामुळे TET उत्तीर्ण असतानाही संबंधित उमेदवारांना या भरती प्रक्रियेपासून वंचित राहावे लागत असल्याची व्यथा विद्यार्थ्यांनी शुभांगी पाटील यांच्याकडे मांडली.

शिक्षणमंत्र्यांकडून प्रधान सचिवांना निर्देश

विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन शुभांगी पाटील यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे तातडीने निवेदन सादर केले. २०२४-२५ नंतर TET उत्तीर्ण झालेल्या D.Ed. व B.Ed. पात्रताधारक विद्यार्थ्यांची नावे पवित्र पोर्टलमध्ये तात्काळ समाविष्ट करून त्यांना शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

या मागणीची दखल घेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे शुभांगी पाटील यांनी सांगितले.

या निर्णयामुळे पवित्र पोर्टलवर नाव समाविष्ट होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या TET उत्तीर्ण उमेदवारांना शिक्षक भरतीत सहभागी होण्याची संधी मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version