माधुरी हत्तीणीच्या ‘घरवापसी’च्या आशा पल्लवित; नांदणी मठात संयुक्त पथकाची पाहणी पूर्ण
पायाभूत सुविधा, पाणी, वैद्यकीय व्यवस्था व सुरक्षेचा घेतला आढावा; २० दिवसांत उच्चस्तरीय समितीकडे अहवाल
कोल्हापूर | प्रतिनिधी : महेश जैन :
शिरोळ तालुक्यातील ऐतिहासिक नांदणी मठाची लाडकी महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीण पुन्हा मठात परतणार का, याबाबतच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. माधुरी हत्तीणीच्या संभाव्य पुनर्वसनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी वनतारा व प्रशासनाच्या संयुक्त पथकाने नांदणी मठाला भेट देऊन पाहणी पूर्ण केली आहे. या पाहणीचा सविस्तर अहवाल आगामी २० दिवसांत उच्चस्तरीय समितीकडे (HPC) सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
हत्तीणीसाठी उपलब्ध सुविधांची तपासणी
उच्चस्तरीय समितीच्या निर्देशानुसार संयुक्त पथकाने नांदणी मठ परिसराची तांत्रिक पाहणी केली. यावेळी माधुरी हत्तीणीसाठी उपलब्ध असलेली निवासाची जागा, पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, फिरण्यासाठी उपलब्ध क्षेत्र तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
हत्तीणीच्या पुनर्वसनासाठी आवश्यक निकषांची पूर्तता होते का, तसेच मठ परिसरात हत्तीणीसाठी सुरक्षित आणि योग्य वातावरण उपलब्ध आहे का, याची माहिती पाहणीदरम्यान घेण्यात आली.
माधुरीला पुन्हा नांदणीत आणण्यासाठी हालचाली
काही महिन्यांपूर्वी कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायालयीन आदेशानुसार नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला गुजरातमधील जामनगर येथील वनतारा प्रकल्पात हलविण्यात आले होते. माधुरी नांदणीतून गेल्यानंतर वारकरी संप्रदाय, भाविक आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
मठाची परंपरा आणि ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन माधुरीला पुन्हा नांदणीत आणण्यासाठी कायदेशीर पातळीवर प्रयत्न सुरू झाले. त्याच पार्श्वभूमीवर संयुक्त पथकाची नांदणी मठातील पाहणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
अहवालानंतर निर्णयाची शक्यता
संयुक्त पथकाचा अहवाल आगामी २० दिवसांत उच्चस्तरीय समितीकडे सादर होणार आहे. मठ परिसरात माधुरी हत्तीणीच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध असल्याचे अहवालातून स्पष्ट झाल्यास तिच्या ‘घरवापसी’चा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
या पाहणीच्या वृत्तामुळे नांदणीसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात माधुरीच्या पुनरागमनाबाबत उत्सुकता निर्माण झाली असून, भाविक आणि ग्रामस्थ तिच्या घरवापसीच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत.
