कंकराळा–पिंपरी फाटा रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका
रुग्णवाहिका, शालेय बससह वाहनचालक त्रस्त; लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
सोयगाव | प्रतिनिधी :
तालुक्यातील कंकराळा ते पिंपरी फाटा या महत्त्वाच्या रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबर उखडून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून, पावसामुळे अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
रुग्णवाहिका ते शालेय बस सर्वांनाच त्रास
कंकराळा, पिंपरी, माळेगाव-पिप्री परिसरातील शेकडो नागरिक दररोज या रस्त्यावरून ये-जा करतात. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होत असून, खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही.
रुग्णवाहिका, शालेय बस तसेच अन्य वाहनांना या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या अडचणी येत आहेत. रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यात अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
‘मतदानाला येतात, विकासाला पाठ’
“निवडणुकीच्या काळात आमदार, खासदार आणि जिल्हा परिषद सदस्य मत मागण्यासाठी गावागावात येतात. मोठमोठी आश्वासने दिली जातात; मात्र निवडून गेल्यानंतर या रस्त्याकडे कोणीही लक्ष देत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
या मार्गावरून शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. संबंधित विभागाने रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून खड्डे बुजविण्याबरोबरच दर्जेदार डांबरीकरण करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे आता तरी गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
