Spread the love

चाळीसगाव शहरातील घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

संशयित आरोपी ताब्यात; ४० हजारांची चोरीची रोकड जप्त

जळगाव | प्रतिनिधी :

चाळीसगाव शहरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून चोरीतील ४० हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, पुढील कारवाईसाठी आरोपी व मुद्देमाल चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

घरातून ८० हजारांची रोकड चोरी

दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली होती. दि. ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घरामागील भिंतीच्या पत्रातून घरात प्रवेश केला. घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेली ८० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले.

या प्रकरणी संशयित नदीम शहा लियाकत शहा आणि त्याच्या साथीदारांवर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून सापळा

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना तपासाबाबत मार्गदर्शन केले.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयिताचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत नदीम शहा हा चाळीसगाव शहरातील घाट रोड, विष्णू पार्क परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ त्या परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.

४० हजारांची रोकड जप्त

पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता संशयिताकडे ४० हजार रुपये रोख आढळून आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदर रक्कम चोरीची असल्याचे त्याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर ही रोकड जप्त करण्यात आली.

आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

पथकात पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, तसेच पोलीस कॉन्स्टेबल महेश पाटील, सागर पाटील आणि भूषण शेलार यांचा समावेश होता.

Share.
Leave A Reply

Exit mobile version