प्रल्हाद सोनवणे यांची भाजपा आदिवासी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती
जळगाव जिल्ह्याला प्रदेशस्तरावर प्रतिनिधित्व; विविध मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
जळगाव | प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी आणि आदिवासी मोर्चाचे प्रभारी आमदार योगेश सागर यांनी केली असून, त्यामध्ये जळगाव येथील ज्येष्ठ भाजपा नेते प्रल्हाद सोनवणे यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात राज्यभरातील संघटन कौशल्य असलेल्या, तसेच आदिवासी समाजासाठी कार्यरत असलेल्या अनुभवी व युवा कार्यकर्त्यांना प्रदेश कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे.
संघटनात्मक कार्याची दखल
प्रल्हाद सोनवणे हे भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष असून, नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन, जळगाव जिल्हा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. आदिवासी समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणे, शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविणे आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करणे या क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना ही महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे.
जिल्ह्याला मिळाले प्रदेशस्तरीय प्रतिनिधित्व
जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार राजू मामा भोळे, माजी आमदार रमेश पाटील, आदिवासी मोर्चाचे प्रदेश संयोजक ॲड. किशोर काळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रल्हाद सोनवणे यांनी पक्ष संघटनेत सक्रियपणे कार्य केले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्याला प्रदेशस्तरावर प्रतिनिधित्व मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
अनेक मान्यवरांकडून अभिनंदन
प्रल्हाद सोनवणे यांच्या नियुक्तीबद्दल मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार राजू भोळे, मंगेश चव्हाण, अमोल जावळे, माजी आमदार रमेश पाटील, भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हरिलाल कोळी व सुभाष पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
आदिवासी समाजासाठी अधिक व्यापक कार्याचा संकल्प
प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रल्हाद सोनवणे हे आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणे, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे, युवक व महिलांना संघटनेशी जोडणे आणि आदिवासी मोर्चाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी कार्य करणार असल्याचे सांगितले जात आहे.
त्यांच्या नियुक्तीमुळे भाजपा आदिवासी मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरात संघटनात्मक उपक्रमांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
