Spread the love

ग्रामपंचायत खडकेला राज्य शासनाचा ‘आदिशक्ती पुरस्कार’ जाहीर; भुसावळ तालुक्यात आनंदाचे वातावरण!

महिला सक्षमीकरण, सामाजिक-शैक्षणिक विकास आणि आरोग्यविषयक उपक्रमांची दखल; तालुक्यात प्रथमच ग्रामपंचायतीला मानाचा पुरस्कार

भुसावळ | प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘आदिशक्ती अभियानात’ उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भुसावळ तालुक्यातील ग्रामपंचायत खडकेला राज्य शासनाचा मानाचा ‘आदिशक्ती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. भुसावळ तालुक्यात प्रथमच हा पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, ग्रामपंचायतीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक व शैक्षणिक विकास, आरोग्यविषयक उपक्रम तसेच विविध जनजागृतीपर कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये ग्रामपंचायत खडकेने उल्लेखनीय कामगिरी केली. या सर्वसमावेशक कार्याची दखल घेत राज्य शासनाने ग्रामपंचायतीची पुरस्कारासाठी निवड केली आहे.

विशेष मार्गदर्शनामुळे यशाला गवसणी

या यशामध्ये भुसावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. कुलदीप ठाकूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आदिशक्ती अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी सरपंच तथा प्रशासक सौ. यशोधरा देविदास तायडे, उपसरपंच सौ. अर्चना झामसिंग पाटील, ग्रामपंचायत अधिकारी सौ. कांचन पंडितराव बादशाह, प्रकल्प/भुसावळ तालुका समन्वयक सुनिल जगन हिवाळे व सौ. दिपाली सुनिल हिवाळे यांनी विशेष योगदान दिले.

तसेच ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि कर्मचारीवर्गाच्या सहकार्यामुळे अभियानाची प्रभावी अंमलबजावणी शक्य झाली.

विविध संस्थांकडून अभिनंदन

ग्रामपंचायत खडकेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेरच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील आणि सहसंचालक रेणू प्रसाद यांच्या वतीने ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

राज्य शासनाचा ‘आदिशक्ती पुरस्कार’ मिळाल्याने खडके ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून भुसावळ तालुक्याच्या गौरवातही भर पडली आहे. ग्रामपंचायतीच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version