नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्रपौत्र चंद्र कुमार बोस यांच्याकडून ‘आजाद हिंद पार्टी’ची घोषणा
Gen-Z आंदोलनातून प्रेरणा; युवकांना केंद्रस्थानी ठेवून नवा राजकीय पर्याय उभारण्याचा मानस
जळगाव | धीरज सैतवाल, प्रतिनिधी
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्रपौत्र चंद्र कुमार बोस यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. ‘आजाद हिंद पार्टी’ या नावाने राजकीय संघटना उभारण्याची तयारी त्यांनी जाहीर केली असून, दिल्लीतील जंतर-मंतरवरील अलीकडील Gen-Z आंदोलनातून प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले
युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य
आजची तरुण पिढी भ्रष्टाचार, शिक्षण, आरोग्य आणि प्रशासनातील समस्यांमुळे अस्वस्थ आहे. युवकांना राजकीय प्रक्रियेत सहभागी करून त्यांना नवा पर्याय देण्याच्या उद्देशाने ‘आजाद हिंद पार्टी’ उभारण्याचा मानस असल्याचे चंद्र कुमार बोस यांनी स्पष्ट केले आहे. प्रस्तावित पक्षाच्या माध्यमातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या समावेशक आणि धर्मनिरपेक्ष विचारांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे वृत्त आहे
TMC सोडल्यानंतर नवी राजकीय वाटचाल
चंद्र कुमार बोस यांनी यापूर्वी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, काही काळातच त्यांनी TMC सोडण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी ते भाजपमध्येही कार्यरत होते. आता दोन्ही प्रमुख पक्षांपासून दूर जात स्वतंत्र राजकीय व्यासपीठ उभारण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
नेताजींच्या विचारांचा नवा राजकीय पर्याय
देशातील तरुणांना एका व्यासपीठावर आणून त्यांच्यामध्ये राजकीय जागरूकता निर्माण करण्याचा आणि नेताजींच्या विचारांवर आधारित नवा राजकीय पर्याय उभा करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. त्यामुळे चंद्र कुमार बोस यांच्या नव्या राजकीय प्रयोगाकडे आगामी काळात विशेष लक्ष लागले आहे
