Spread the love

जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची सभा; औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याच्या सूचना

सर्पदंश, रेबीजसह अत्यावश्यक औषधांचा नियमित साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश; हिरकणी कक्षाचे लोकार्पण

सोयगाव| प्रतिनिधी

जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद सदस्या सौ. पुष्पाताई प्रकाश काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याबाबत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी सर्पदंश, रेबीज, टायफॉईड, न्यूमोनिया तसेच गरोदर माता आणि लहान बालकांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचा पुरेसा साठा कायम उपलब्ध ठेवावा, अशा सूचना देण्यात आल्या. ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या उपचारांसाठी आवश्यक औषधे वेळेवर उपलब्ध व्हावीत, याबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.

वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना नियमित सेवा बजावण्याच्या सूचना

आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नियमितपणे आपली सेवा बजावावी. रुग्णांना उपचारासाठी अनावश्यक त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. सेवेत हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना सभेत देण्यात आल्या.

स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाचे लोकार्पण

सभेच्या निमित्ताने स्तनदा मातांसाठी उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे लोकार्पण करण्यात आले. या कक्षामुळे आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या स्तनदा मातांना आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून, त्यांच्या सोयीच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती

सभेस सौ. जयश्री पवार (पंचायत समिती सदस्या), नंदाताई आगे (जिल्हा समिती सदस्य), सौ. स्वाती पाटील (सरपंच, जरंडी), सौ. वंदनाताई पाटील (माजी सरपंच), संजीवन सोनवणे (माजी पंचायत समिती सदस्य), राजेंद्र पाटील, दिलीप पाटील, भिवा चव्हाण, तसेच वैद्यकीय अधिकारी सचिन पवार, प्रयोगशाळा परिचर ज्ञानेश्वर पाटील, पर्यवेक्षक अनिता राठोडअनिल जोहरे, संगीता वानखेडे, दादाराव झोंड यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. सभेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवा, औषध उपलब्धता आणि नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यात आला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version