कोळन्हावी जवळील तापी पुलावरून २९ वर्षीय तरुणाची नदीत उडी; शोधमोहीम सुरू
दुचाकी, मोबाईल व पाकीट पुलावर ठेवून उडी; उडी घेण्यापूर्वी बहिणीला केला फोन
यावल | विशेष प्रतिनिधी : हर्षल पाटील
किनगाव येथून जळगावकडे जात असलेल्या २९ वर्षीय तरुणाने कोळन्हावी जवळील तापी नदीच्या पुलावरून नदीपात्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. नीलेश मधुकर धनगर (वय २९, रा. किनगाव खुर्द, ता. यावल) असे संबंधित तरुणाचे नाव आहे. घटनेनंतर तापी नदीपात्रात त्याचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
पुलावर दुचाकी, मोबाईल आणि पाकीट ठेवले
मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश धनगर बुधवारी काही कामानिमित्त किनगाव येथून जळगावकडे निघाला होता. कोळन्हावी जवळील तापी नदीच्या पुलावर आल्यानंतर त्याने आपली दुचाकी पुलाच्या कडेला उभी केली. त्यानंतर मोबाईल आणि पाकीट दुचाकीवरच ठेवून त्याने नदीपात्रात उडी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
उडी घेण्यापूर्वी बहिणीला केला फोन
नदीत उडी घेण्यापूर्वी नीलेशने आपल्या बहिणीला फोन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. पुलावर दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आल्यानंतर आणि त्यावर मोबाईल व पाकीट दिसल्याने स्थानिकांच्या ही बाब निदर्शनास आली.
यावल पोलिसांकडून शोधमोहीम
घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक मच्छीमार आणि आपत्कालीन पथकाच्या मदतीने तापी नदीपात्रात नीलेशचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
नीलेशने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संदीप सूर्यवंशी करीत आहेत. या घटनेमुळे किनगाव खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
