Spread the love

भवरखेडेत दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार; ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर

अवैध दारूविक्रीमुळे सामाजिक समस्या वाढल्याचा आरोप; प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी

भवरखेडे | प्रतिनिधी : अजय बाविस्कर

गावातील अवैध दारूविक्रीला आळा घालून दारूबंदी लागू करण्यात यावी, या मागणीसाठी भवरखेडे येथील महिलांनी एकजूट दाखवत एल्गार पुकारला. दि. १३ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामसभेत महिलांनी दारूबंदीच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला.

गावातील अवैध दारूविक्रीमुळे कुटुंबातील वाद, सामाजिक समस्या आणि तरुण पिढीवर होणारे दुष्परिणाम वाढत असल्याची चिंता महिलांसह ग्रामस्थांनी व्यक्त केली. गावातील शांतता आणि सामाजिक वातावरण अबाधित ठेवण्यासाठी दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

ग्रामसभेत ठराव क्र. ३ मंजूर

दारूबंदीच्या मागणीसंदर्भात ग्रामसेवक सी. एन. सोनवणे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर गावात दारूबंदी लागू करण्याबाबतचा ठराव क्र. ३ ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.

पोलीस व दारूबंदी विभागाकडे निवेदन देणार

पुढील कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाहीसाठी भवरखेडे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच महिला यांच्या वतीने धरणगाव पोलीस स्टेशन, पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव आणि दारूबंदी विभाग जळगाव यांच्याकडे निवेदन सादर करण्यात येणार आहे.

अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि गावात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी महिलांनी केली आहे.

महिलांच्या भूमिकेमुळे दारूबंदीचा मुद्दा ऐरणीवर

दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भवरखेडे गावातील दारूबंदीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्रामसभेतील ठरावानंतर प्रशासन याबाबत कोणती कार्यवाही करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version