लोकमातेच्या स्मृतिदिनानिमित्त महात्मा फुले हायस्कूलमध्ये अभिवादन; गरीब विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण
संत सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळाकडून ३१०० रुपयांचा धनादेश; माजी विद्यार्थी नितीश कापडणेंकडून ५ गणवेश
धरणगाव | प्रतिनिधी :
धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सवी महात्मा फुले हायस्कूल येथे लोकमाता राजमाता माँसाहेब अहिल्यामाई होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून गणवेशाचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. डी. पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. पवार होते. यावेळी संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त संत सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळ, मोठा माळीवाडा यांच्या वतीने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ३१०० रुपयांचा धनादेश मुख्याध्यापक जे. एस. पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
तसेच शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका एम. के. कापडणे यांचे चिरंजीव, जळगाव येथील अभियंता व शाळेचे माजी विद्यार्थी नितीश कापडणे यांच्या वतीने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ५ गणवेशांचे वितरण करण्यात आले.
अहिल्यामाईंच्या कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय
यावेळी एस. व्ही. आढावे व पी. डी. पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजना, पाणवठे, विहिरी, मंदिरे, घाट तसेच त्यांची युद्धनीती व युद्धकौशल्य याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. लोककल्याणकारी कार्यामुळेच अहिल्यामाई होळकर यांना लोकमाता म्हणून गौरविले जाते, असे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक जे. एस. पवार यांनी होळकर घराण्याचा वारसा तसेच चोंडीच्या कन्येपासून लोकमातेपर्यंतचा अहिल्यामाईंचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला.
संत सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळाच्या वतीने धनादेश आणि माजी विद्यार्थी नितीश कापडणे यांच्या वतीने गणवेश देण्यात आल्याबद्दल मुख्याध्यापकांनी सर्वांचे आभार मानले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले.
कार्यक्रमाला पंचमंडळाचे अध्यक्ष व्ही. टी. माळी, सचिव आर. डी. महाजन, सल्लागार पंच एच. डी. माळी, पी. डी. पाटील यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन पी. डी. पाटील यांनी केले, तर आभार एच. डी. माळी यांनी मानले.
