Spread the love

सारोळा शाळेतील ५९ गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिनी होणार गौरव

गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप; भीमराव सांगळे यांच्याकडून ११ हजारांचे बक्षीस

अहिल्यानगर प्रतिनिधी | बापुसाहेब घोडेस्वार

जामखेड : “गुणवंत विद्यार्थी हेच भारताचे उज्ज्वल भविष्य आहे,” या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सारोळा येथील माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष तथा उद्योजक भीमराव गोविंदराव सांगळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी ११ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता चौथी, पाचवी, सातवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच NMMS परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या तब्बल ५९ गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर गौरव करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन

भीमराव सांगळे यांच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ११ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठीही त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांनी यापूर्वी शाळेसाठी १ लाख २ हजार ६०१ रुपयांची देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार प्रेरणा

सारोळा शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी सातत्याने मदतीचा हात देणाऱ्या सांगळे यांच्या दातृत्वाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अधिक मेहनत घेऊन शैक्षणिक यश संपादन करण्याची प्रेरणा निर्माण होत आहे.

या दातृत्वाबद्दल सरपंच रितूताई काशीद, अजयदादा काशीद, उपसरपंच हर्षद मुळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश मुळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगदाळे, ग्रेड मुख्याध्यापक संदीप भालसिंग, सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या वतीने भीमराव सांगळे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version