स्वातंत्र्यदिनाचा अनोखा उपक्रम; गाव स्वच्छ ठेवणाऱ्या बळीराम अढायगे यांना ध्वजारोहणाचा मान — विद्यार्थ्यांची भव्य प्रभातफेरी
कासारखेडा (ता. यावल) | विशेष प्रतिनिधी : हर्षल पाटील
स्वातंत्र्यदिनानिमित्त कासारखेडा ग्रामपंचायतीने सामाजिक समता आणि श्रमप्रतिष्ठेचा आदर्श निर्माण करणारा अनोखा उपक्रम राबविला. ग्रामपंचायतीच्या वतीने यंदा राष्ट्रध्वजारोहणाचा मान लोकप्रतिनिधी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना न देता गाव स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र सेवा बजावणारे सफाई कर्मचारी श्री. बळीराम सिताराम अढायगे यांना देण्यात आला. त्यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण झाल्याने या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अनिता मुराद तडवी व उपसरपंच सौ. अश्विनी रामप्रसाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. ध्वजारोहणावेळी पारंपरिक पद्धतीने पूजा, नारळ वाढविणे व पुष्पवृष्टी करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
गाव स्वच्छ ठेवणाऱ्या हातांना राष्ट्रध्वज फडकविण्याचा मान
कासारखेडा गावाची स्वच्छता राखण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या बळीराम अढायगे यांच्या योगदानाची दखल घेत ग्रामपंचायतीने त्यांना ध्वजारोहणाचा मान दिला. पांढरा शुभ्र पोशाख व गांधी टोपी परिधान करून त्यांनी राष्ट्रध्वज फडकविला आणि राष्ट्रध्वजाला सलामी दिली. या प्रसंगामुळे उपस्थित ग्रामस्थांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली.
विद्यार्थ्यांची भव्य प्रभातफेरी; देशभक्तीपर घोषणांनी गाव दुमदुमले
ध्वजारोहणानंतर मनुदेवी माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून भव्य प्रभातफेरी काढली. हातात तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’ यांसह देशभक्तीपर घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कासारखेडा परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.
या कार्यक्रमास ग्रामसेवक भरत पाटील, पोलीस पाटील प्रवीण पाटील, कृषी सहाय्यक विनोद शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी रवींद्र न्हावी, धनंजय पाटील, वसीम तडवी, शिक्षकवृंद, विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य, महिला मंडळ तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
‘गाव स्वच्छ ठेवणाऱ्या हातांना राष्ट्रध्वज फडकविण्याचा सन्मान’ देत कासारखेडा ग्रामपंचायतीने श्रमाला प्रतिष्ठा आणि समानतेचा संदेश दिला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राबविलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे आणि कष्टकरी वर्गाच्या सन्मानाचे प्रेरणादायी उदाहरण ठरला.
