जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी विषयावर विशेष भर; १४ केंद्रांवर ५६० विद्यार्थ्यांचा सहभाग
पाचोरा | प्रतिनिधी : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे इंग्रजी विषयातील वाचन, आकलन आणि शब्दलेखन कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने पाचोरा पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रस्तरीय ‘स्पेलिंग बी’ सराव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गट विकास अधिकारी के. बी. अंजने आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात आला.
गटशिक्षणाधिकारी विजय पवार, शालेय पोषण आहार अधीक्षक सरोज गायकवाड आणि गट समन्वयक जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १० ऑगस्ट २०२६ रोजी शाळास्तरावर स्पेलिंग बी सराव स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पाचोरा तालुक्यातील सुमारे १४५ जिल्हा परिषद शाळांनी सहभाग नोंदविला.
१४ केंद्रांवर ५६० विद्यार्थ्यांचा सहभाग
शाळास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ११ ऑगस्ट २०२६ रोजी केंद्रस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील १४ केंद्रांवर झालेल्या या उपक्रमात सुमारे ५६० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांची स्पर्धा एकूण चार गटांमध्ये घेण्यात आली.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतील शब्दसंग्रह वाढविण्यासोबतच अचूक शब्दलेखन, वाचन आणि आकलन कौशल्य विकसित करण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाबद्दल आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी सांगितले.
शिक्षकांच्या परिश्रमातून उपक्रम यशस्वी
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष शिक्षिका प्रज्ञा आराध्ये, केंद्रप्रमुख अनिल पाटील, सखाराम महाजन, संदीप पवार, शांताराम वानखेडे, जितेंद्र पाटील, राजेश सोनवणे, रामदास जाधव, रामराव पाटील, संजय काळे, जावेद शेख, विशाल पवार, ज्ञानेश्वर पाचोळे, अनिल वराडे, चंद्रकांत मोराणकर, सुनील शिवदे, गिरीश भोयर, कैलास बडगुजर तसेच सर्व विशेष शिक्षकांनी परिश्रम घेतले.
अशी रंगते ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा
स्पर्धेदरम्यान प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांना रांगेत उभे केले जाते. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला एक इंग्रजी शब्द सांगून त्याचे अचूक स्पेलिंग सांगण्यास सांगितले जाते. चुकीचे स्पेलिंग सांगणारा विद्यार्थी स्पर्धेतून बाद होतो. अशा पद्धतीने स्पर्धा पुढे सुरू राहते आणि शेवटपर्यंत अचूक स्पेलिंग सांगत टिकून राहिलेला विद्यार्थी विजेता ठरतो.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेची गोडी निर्माण करण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढविणाऱ्या या उपक्रमाचे पालक व शिक्षण क्षेत्रातून कौतुक होत आहे.
