Spread the love

जळगाव | प्रतिनिधी : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि मुक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमर शहीद हुतात्म्यांना रक्तदानाच्या माध्यमातून अनोखी आदरांजली अर्पण करण्यात आली. या प्रेरणादायी उपक्रमात दिव्यांग विक्रमी रक्तदाते मुकुंद गोसावी यांनी आपल्या शारीरिक अडचणींवर मात करत स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले.

१५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान उपक्रमाचा उद्देश गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देणे हा होता. विशेषतः थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल, रक्तक्षय तसेच गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी नियमित रक्तसाठा उपलब्ध राहावा, यासाठी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

रक्तदानातून हुतात्म्यांना अनोखी मानवंदना

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या त्यागाची आठवण ठेवत रक्तदान करून त्यांना आदरांजली वाहण्याचा उपक्रम राबविण्यात आला. ‘रक्तदान म्हणजे जीवनदान’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला रक्तदाते आणि सेवाभावी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मान्यवरांची उपस्थिती

या प्रसंगी रेडक्रॉसचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रोहनजी घुगे (आयएएस), चेअरमन मंगला ठोंबरे, रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार जैन, उपाध्यक्ष गनीभाई मेमनडॉ. शशिकांत गाजरे, हेमंत जकातदार, डॉ. उल्हास तासखेडकर, अनिल भोळे यांच्यासह विविध मान्यवर व रक्तदाते उपस्थित होते.

या उपक्रमासाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे एस. पी. गणेशकरसीए हितेश आगीवाल, गणेश पाटील, अक्षय महाजन, सतीशकुमार महाजन, हर्षद भारती, अजय देशमुख, गोपाल वालेच्या, अविनाश पाटील, रणजीत गव्हाळे, डॉ. मेहुल कुमार, वैभव निकुंभ आदींनी सहकार्य केले.

वर्षभर रक्तदान करण्याचे आवाहन

शहरासह जिल्ह्यातील सामाजिक सेवाभावी संस्था, प्रतिष्ठाने, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हुतात्म्यांच्या त्यागाची आठवण ठेवून वर्षभर रक्तदान सेवेत सहभागी व्हावे, तसेच रक्तदानाच्या पवित्र कार्यातून गंभीर व गरजू रुग्णांना जीवनदान द्यावे, असे आवाहन विक्रमी रक्तदाते मुकुंद गोसावी यांनी केले.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना रक्तदानाच्या माध्यमातून वाहिलेली ही आदरांजली सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेचा प्रेरणादायी संदेश देणारी ठरली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version