Spread the love

सहा दिवसांपासून सुरू असलेल्या बिराड आंदोलनाकडे दुर्लक्षाचा आरोप; बचत गटांच्या महिलांची जोरदार घोषणाबाजी

धुळे | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या उमेद व मानव विकास अभियानातील कथित गैरव्यवहाराविरोधात बचत गटांच्या महिला आक्रमक झाल्या असून, भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महिलांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्या दालनाबाहेर बेशरमची फुले हातात घेऊन ठिय्या आंदोलन केले.

यावेळी महिलांनी कथित भ्रष्ट कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे जिल्हा परिषद परिसरात काही काळ वातावरण चांगलेच तापले होते. आंदोलनकर्त्या महिलांनी सीईओ यांना निवेदन देऊन आपल्या मागण्यांवर चर्चा केली.

मशीन वाटपात गैरव्यवहाराचा आरोप

उमेद व मानव विकास अभियानाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध प्रकारच्या मशीनचे वाटप करण्यात आले होते. मात्र, कालांतराने अनेक मशीन बंद पडल्याने संबंधित बचत गटांच्या महिलांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मशीन खरेदी प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत बचत गटांच्या महिलांनी यापूर्वीही प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने दिली होती. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, या मागणीसाठी महिलांनी बिराड आंदोलन सुरू केले.

सहा दिवसांपासून आंदोलन; प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी

गेल्या सहा दिवसांपासून बिराड आंदोलन सुरू असतानाही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आंदोलनाची तीव्रता वाढवत थेट जिल्हा परिषद सीईओंच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

हातात बेशरमची फुले घेऊन महिलांनी प्रशासनाचा निषेध केला. उमेद अभियानातील मशीन खरेदी प्रक्रियेतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करावी, दोषी आढळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि बचत गटांच्या महिलांचे नुकसान भरून काढण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महिला आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम

या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल यांच्यासह भारती माळी, रेखाबाई पाटील, संगीता पाटील, मनिषा पाटील, सरलाबाई पाटील, सरला महाले, निर्मला महाले, ज्योती साळुंखे, सुरेखा साळुंखे आणि संगीता साळुंखे यांच्यासह बचत गटांच्या महिला सहभागी झाल्या.

उमेद अभियानाचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे असताना, मशीन खरेदीतील कथित गैरव्यवहारामुळे महिलांचेच नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी व योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version