स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव; उमेद अभियानातील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी आंदोलन
धुळे | प्रतिनिधी : स्वातंत्र्यदिनानिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत जिल्ह्यात सुरू असलेल्या तसेच पूर्ण झालेल्या विविध विकासकामांची माहिती दिली.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
उमेद अभियानातील कथित गैरव्यवहाराविरोधात आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न
दरम्यान, उमेद अभियानातील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांवरून कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा प्रयत्न हाणून पाडल्याने मोठा अनर्थ टळला.
उमेद अभियानातील कथित गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बचत गटांच्या महिला व सामाजिक कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमादरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली.
शासकीय कार्यालयांमध्येही उत्साहात ध्वजारोहण
स्वातंत्र्यदिनानिमित्त सकाळपासूनच धुळे शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
त्यानंतर विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी झाले.
मान्यवरांची उपस्थिती
मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, मनपा आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, आमदार अनुप अग्रवाल, राम भदाणे, मंजुळा गावित, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, सभापती लताबाई पोतदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विनोद भदाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय सोहळा एका बाजूला उत्साहात पार पडत असतानाच आंदोलकांच्या आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे प्रशासन आणि पोलिसांची सतर्कता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
