एसएससीत प्रथम आलेल्या वैभव माळीच्या हस्ते ध्वजारोहण; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
धरणगाव | प्रतिनिधी : वाल्मिक पाटील
धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सवी महात्मा फुले हायस्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. एसएससी बोर्डाच्या परीक्षेत शाळेतून प्रथम क्रमांक मिळविणारा विद्यार्थी वैभव राकेश माळी याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. पवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन होते. प्रमुख अतिथी म्हणून संचालक मोतीलाल महाजन, गोपाल महाजन, माजी मुख्याध्यापक एस. डब्ल्यू. पाटील, पत्रकार धर्मराज मोरे, ह. भ. प. हिरालाल महाराज, सिताराम महाजन, केदार मॅडम, शुभम महाजन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच १९९९ बॅचचे माजी विद्यार्थी, शाळेचे माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तंबाखूमुक्तीची सामूहिक शपथ
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांनी तंबाखूमुक्तीची सार्वजनिक शपथ घेतली. त्यानंतर क्रीडा शिक्षक एच. डी. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कवायत संचलन सादर केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिसे व शैक्षणिक साहित्य देऊन गौरव
मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पहिली ते नववी तसेच एसएससी बोर्डाच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांनाही बक्षिसे देण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य, कपडे तसेच महापुरुषांचे अनमोल ग्रंथ देऊन प्रोत्साहित करण्यात आले. विश्वस्त मोतीलाल महाजन, दीपक वाघ आणि नरेंद्र बडगुजर यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक केले.
उत्कृष्ट बीएलओ पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सत्कार
शाळेतील उपशिक्षक पी. डी. पाटील व एम. बी. मोरे यांना नगरपालिकेकडून ‘उत्कृष्ट बीएलओ पुरस्कार’ मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
‘गुणवंत विद्यार्थ्यांनी शिकून शाळेचे नाव मोठे करावे’
अध्यक्षीय भाषणात संस्थाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून, विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यास करून जीवनात मोठे यश संपादन करावे आणि आपल्या कर्तृत्वातून शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी दिनेश शेठ लोहार यांच्या वतीने विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख एस. एन. कोळी व पी. डी. पाटील यांनी केले, तर आभार व्ही. टी. माळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
