Spread the love

पाळधीत झंवर विद्यालयाची भव्य तिरंगा रॅली; १०० फुटी तिरंगा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; भारतमाता, वीर जवानांसह महापुरुषांच्या वेशभूषेने वेधले लक्ष

पाळधी | प्रतिनिधी : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पाळधी येथील स. न. झंवर विद्यालयातर्फे शुक्रवारी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. तब्बल १०० फुटांचा भव्य तिरंगा ध्वज या रॅलीचे विशेष आकर्षण ठरला. विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण पाळधी गाव राष्ट्रभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले.

भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन शालेय समितीचे अध्यक्ष सुनील झंवर यांच्या पुढाकाराने करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने रॅलीत सहभाग घेतला. हातात तिरंगा घेऊन विद्यार्थी रॅलीत सहभागी झाल्याने संपूर्ण परिसर तिरंगामय झाला होता.

महापुरुषांच्या वेशभूषेने वेधले लक्ष
रॅलीच्या सुरुवातीला सादर करण्यात आलेल्या सजीव देखाव्याने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. भारत माता, वीर जवान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पंडित जवाहरलाल नेहरू आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी रॅलीची शोभा वाढवली.

देशभक्तीपर गीतांच्या तालावर विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी संपूर्ण पाळधी गाव दुमदुमून गेले. १०० फुटी तिरंगा रॅलीतून मार्गक्रमण करत असताना नागरिकांनी त्याचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांचा विशेष सराव
रॅली यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक सागर मणियार व संगीता निकम यांनी विद्यार्थ्यांकडून विशेष सराव करून घेतला. रॅलीच्या नियोजनात संगीता बिर्ला, मनोज नन्नवरे, विवेक भदाणे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत
रॅली गावातील विविध भागांतून मार्गक्रमण करत असताना ग्रामस्थांनी तिचे उत्स्फूर्त आणि जंगी स्वागत केले. विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या सहभागामुळे रॅलीला विशेष भव्यता प्राप्त झाली. महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थी आणि १०० फुटी तिरंग्यामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले.

या तिरंगा रॅलीतून राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला. विद्यालयाने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक करून विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाचे अभिनंदन केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version