Spread the love

स्वातंत्र्यदिनी पी. डी. पाटील व एम. बी. मोरे यांना ‘उत्कृष्ट बीएलओ’ पुरस्कार

धरणगाव नगरपरिषदेत ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात; एसआयआरचे काम वेळेआधी पूर्ण केल्याबद्दल पी. डी. पाटील यांचा विशेष गौरव

धरणगाव | प्रतिनिधी : वाल्मिक पाटील

धरणगाव नगरपरिषदेत भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय स्मारकासमोरील तिरंगा चौकात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रोशनसिंग राजपूत यांच्या हस्ते पूजन करण्यात आले, तर नगराध्यक्षा लीलाबाई सुरेश चौधरी यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रगीत, वंदे मातरम् आणि महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाच्या या सोहळ्यात धरणगाव शहरातील सहा मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) उत्कृष्ट बीएलओ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यामध्ये महात्मा फुले हायस्कूलचे उपशिक्षक तथा यादी भाग क्रमांक १९९ चे बीएलओ पी. डी. पाटील आणि यादी भाग क्रमांक १९५ चे बीएलओ एम. बी. मोरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. नगराध्यक्षा लीलाबाई चौधरी आणि मुख्याधिकारी रोशन राजपूत यांच्या हस्ते दोघांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

एसआयआरचे काम वेळेआधी पूर्ण
धरणगाव शहरातील मोठा माळीवाडा परिसरातील भारत निवडणूक आयोगाच्या एसआयआर (विशेष सघन पुनरीक्षण) मतदार पुनरिक्षण कार्यक्रमात पी. डी. पाटील यांनी शहरात प्रथम क्रमांकाने आणि निर्धारित वेळेपूर्वी काम पूर्ण केले. मतदार याद्या अद्ययावत ठेवणे, फॉर्म क्रमांक ६, ७ व ८ वेळोवेळी भरणे तसेच वर्षभर मतदार जनजागृती करण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन नगरपरिषदेकडून प्रथमच त्यांना ‘उत्कृष्ट बीएलओ’ पुरस्कार देण्यात आला.

मुख्याधिकारी रोशन राजपूत यांनी पी. डी. पाटील यांच्या कार्याचे कौतुक करताना, एसआयआरचे काम शहरात प्रथम क्रमांकाने पूर्ण करण्यामागे त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व असल्याचे सांगितले.

यापूर्वीही तीन वेळा आदर्श बीएलओ पुरस्कार
पी. डी. पाटील यांना यापूर्वीही तहसील कार्यालय, धरणगाव यांच्या माध्यमातून तीन वेळा आदर्श बीएलओ पुरस्कार मिळाला आहे. तहसीलदार नितीनकुमार देवरे आणि तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते त्यांचा यापूर्वी गौरव करण्यात आला होता.

नगरपरिषदेने आपल्या कार्याची दखल घेऊन स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सन्मान केल्याबद्दल पी. डी. पाटील यांनी आभार व्यक्त केले. “पुरस्काराने काम करण्यास ऊर्जा मिळते,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास मुख्याधिकारी रोशन राजपूत, नगराध्यक्षा लीलाबाई सुरेश चौधरी, उपनगराध्यक्ष सुरेखा विजय महाजन, भिकन पवार, सांस्कृतिक व क्रीडा समितीच्या सभापती प्रियंका चेतन जाधव, सर्व नगरसेवक, पत्रकार कडू महाजन, धर्मराज मोरे, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व साहित्य क्षेत्रातील मान्यवर, नगरपरिषदेचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच धरणगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने झालेल्या या पुरस्कार वितरणामुळे निवडणूक प्रक्रियेत जबाबदारीने काम करणाऱ्या बीएलओ कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळाले असून, मतदार यादी अद्ययावत ठेवण्याच्या कामाला अधिक चालना मिळणार आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version