Spread the love

श्री बदरीनाथ मंदिरात नर-नारायण जयंती उत्साहात साजरी

जन्मोत्सव, फुलबंगला दर्शन, पालखी सोहळा आणि विशेष कीर्तनाने मंदिर परिसर भक्तिमय; हजारो भाविकांची उपस्थिती

जळगाव | प्रतिनिधी :

मन्यारखेडा गावालगत असलेल्या श्री बदरीनाथ मंदिरात हिमालयातील श्री बदरीनाथ धामच्या परंपरेनुसार नर-नारायण जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून श्री नर-नारायण भगवानांचे दर्शन घेत धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला.

जन्मोत्सव व फुलबंगला दर्शन
जयंतीनिमित्त दुपारी १२ वाजता श्री नर-नारायण भगवानांचा जन्मोत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांसाठी आकर्षक फुलबंगला दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विविध प्रकारच्या सुगंधी फुलांनी सजविण्यात आलेल्या फुलबंगल्यामुळे मंदिरातील वातावरण अधिक प्रसन्न आणि भक्तिमय झाले होते. जन्मोत्सवानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

मन्यारखेड्यात पालखी सोहळा
दुपारनंतर संध्याकाळी ४ वाजता श्री नर-नारायण भगवानांची पालखी (डोली) काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, धार्मिक जयघोष आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागात पालखीने मन्यारखेडा गावातून नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. मार्गावर भाविकांनी दर्शन घेत पालखीचे स्वागत केले.

बदरीनाथ परंपरेनुसार विशेष कीर्तन
रात्री ९ वाजता गादीपती श्री मयूरगोविंदजी महाराज यांचे नर-नारायण भगवानांच्या जन्मोत्सवानिमित्त बदरीनाथ परंपरेनुसार विशेष कीर्तन झाले. कीर्तनातून नर-नारायण भगवानांचे महत्त्व आणि धार्मिक परंपरेचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचविण्यात आला. कीर्तनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

निशिगंधाच्या फुलांनी मंदिराची आकर्षक सजावट
जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण मंदिर परिसर निशिगंधाच्या सुगंधी फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला होता. फुलांची मनोहारी सजावट, धार्मिक विधी, जन्मोत्सव, पालखी सोहळा आणि विशेष कीर्तन यामुळे दिवसभर मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

उत्सवाच्या निमित्ताने जळगावसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिरात उपस्थित राहून श्री नर-नारायण भगवानांचे दर्शन घेतले. धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि भक्तिभावाच्या वातावरणात नर-नारायण जयंती उत्सवाची सांगता झाली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version