गाढोदे येथे वर्षावास प्रवचन मालिकेचे पाचवे पुष्प उत्साहात संपन्न
‘प्रतीत्यसमुत्पाद अर्थात कार्यकारणभाव’ विषयावर बी. एस. पवार गुरुजींचे सोप्या भाषेत मार्गदर्शन
गाढोदे, ता. जळगाव : भारतीय बौद्ध महासभा, जळगाव पूर्व अंतर्गत जळगाव तालुक्याच्या वतीने आयोजित राष्ट्रीय वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे पाचवे पुष्प गाढोदे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी आदरणीय बी. एस. पवार गुरुजी (केंद्रीय शिक्षक तथा जिल्हा संघटक, भारतीय बौद्ध महासभा, जळगाव पूर्व) यांनी ‘प्रतीत्यसमुत्पाद अर्थात कार्यकारणभाव’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. भगवान बुद्धांनी सांगितलेल्या प्रतीत्यसमुत्पादाच्या तत्त्वाचा दैनंदिन जीवनाशी संबंध जोडत त्यांनी हा विषय अत्यंत सोप्या आणि समजेल अशा भाषेत उपस्थितांसमोर मांडला.
कार्यक्रमाला आयु. रविंद्र वानखेडे गुरुजी, बौद्धाचार्य आयु. गौतम सपकाळे, गाढोदे महिला ग्राम शाखेच्या अध्यक्षा आद. कविताताई सपकाळे यांच्यासह महिला ग्राम शाखेची संपूर्ण कार्यकारिणी उपस्थित होती. तसेच परिसरातील मोठ्या संख्येने श्रद्धाशील व धम्मनिष्ठ बौद्ध उपासक-उपासिका, बालक आणि बालिका उपस्थित होते.
धम्मविचारांनी भारले वातावरण
वर्षावासाच्या काळात आयोजित करण्यात येणाऱ्या या प्रवचन मालिकेच्या माध्यमातून भगवान बुद्धांचा धम्म, त्यांची शिकवण आणि मानवी जीवनातील त्याचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रवचनादरम्यान उपस्थितांनी शांतपणे धम्मविचारांचे श्रवण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. गौतम सपकाळे यांनी केले, तर आभार आयु. कविताताई सपकाळे यांनी मानले.
उत्स्फूर्त उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले. वर्षावास प्रवचन मालिकेतील पुढील कार्यक्रमांनाही बौद्ध उपासक-उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
