Spread the love

ऐनपूरच्या सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयात ‘पुस्तक पेढी’ योजनेतून विद्यार्थ्यांना पुस्तक संचांचे वाटप

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत; वर्षभर सुमारे २० पुस्तकांचा संच मोफत वापरासाठी उपलब्ध

ऐनपूर | प्रतिनिधी – प्रदीप खैरे, रावेर

ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात ग्रंथालयाच्या वतीने ‘पुस्तक पेढी’ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तक संचांचे वाटप करण्यात आले. मुंबई येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने प्राप्त झालेले पुस्तक संच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी विद्यार्थ्यांनी उपलब्ध करून देण्यात आलेल्या पुस्तक संचांचा शैक्षणिक प्रगतीसाठी अधिकाधिक उपयोग करावा, असे आवाहन केले. तसेच ग्रंथालयातील विविध अवांतर वाचन साहित्याचा नियमित वापर करून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त योजना

अत्यल्प उत्पन्न गटातील तसेच आर्थिक परिस्थितीमुळे अभ्यासक्रमाची पुस्तके खरेदी करणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘पुस्तक पेढी’ योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक वर्षासाठी दोन्ही सत्रांमध्ये प्रत्येकी सुमारे २० पुस्तकांचा संच वापरण्यासाठी दिला जातो.

प्रत्येक पुस्तक संचाची अंदाजे किंमत ४ हजार रुपये असून, विद्यार्थ्यांना ही पुस्तके संपूर्ण वर्षभर मोफत वापरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा पुरेसा लाभ मिळत असून त्यांच्या अभ्यासाला मोठी मदत होत आहे.

मान्यवरांची उपस्थिती

पुस्तक वितरण कार्यक्रमास ग्रंथालय समितीचे सदस्य प्रा. डॉ. पी. आर. महाजन, उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव, प्रा. हेमंत बाविस्कर, प्रा. व्ही. एन. रामटेके, प्रा. जे. पी. नेहेते, प्रा. एस. एस. साळुंके, प्रा. डॉ. एम. के. सोनवणे, प्रा. डॉ. एस. पी. उमरीवाड, प्रा. अंकुर पाटील, श्री. महेंद्र महाजन, श्री. सर्वेश चौधरी तसेच योजनेचे लाभार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रा. डॉ. एस. एस. साळुंके यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. व्ही. एन. रामटेके यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version