Spread the love

आयुर्वेदिक गोळ्यांच्या आड भांगच्या गोळ्यांची तस्करी; कंटेनरमधून १७५ किलो माल जप्त

धुळे एलसीबीची मोठी कारवाई; सुमारे ४ लाखांचा माल जप्त, कंपनीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

धुळे | प्रतिनिधी

आयुर्वेदिक गोळ्यांच्या आडून भांगच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या परराज्यातील कंटेनरवर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) कारवाई केली. या कारवाईत कंटेनरमधून सुमारे १७५ किलो भांगच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या असून, जप्त मालाची किंमत अंदाजे चार लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मध्यप्रदेशातून कंटेनरच्या माध्यमातून महाराष्ट्रात भांगच्या गोळ्यांची तस्करी केली जाणार असल्याची गुप्त माहिती एलसीबीच्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून एमपी ०९ जीजी ३१९९ क्रमांकाचा कंटेनर अडवून तपासणी केली. तपासणीदरम्यान आयुर्वेदिक गोळ्यांच्या आडून भांगच्या गोळ्यांची वाहतूक होत असल्याचे समोर आले.

चालकासह खरेदीदारावर गुन्हा

या प्रकरणी कंटेनर चालक मोहम्मद साबीर मुशर्रफ खान (४७, रा. इंदोर, मध्यप्रदेश) तसेच मालाचा खरेदीदार इरफान मकबूल शेख (रा. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मध्यप्रदेशातील मेहता आयुर्वेदिक संस्थान या कंपनीचाही प्रकरणात समावेश करण्यात आला आहे.

एलसीबीच्या कारवाईमुळे आयुर्वेदिक उत्पादनांच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित अमली पदार्थांच्या वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील मालाचा स्रोत, वाहतुकीचा मार्ग तसेच यामागील इतर व्यक्तींचा सहभाग याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एलसीबीचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

जप्त करण्यात आलेल्या मालासंदर्भात पुढील तपास सोनगीर पोलिसांकडून सुरू असून, तस्करीच्या या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version