भडगाव तालुक्यातील दलित-आदिवासींच्या घरकुल प्रश्नांवर रिपाइंचे निवेदन
घरकुल सर्वेपासून वंचित ठेवल्याचा आरोप; अतिक्रमण नियमित करून लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्याची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
भडगाव | प्रतिनिधी – गणेश रावळ
भडगाव तालुक्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांचे घरकुलांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने गटविकास अधिकारी के. बी. अंजने यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
तालुकाध्यक्ष खेडकर आण्णा यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह वरखेड येथील ग्रामस्थांनी हे निवेदन सादर केले. तालुक्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील अनेक पात्र लाभार्थ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता घरकुलाच्या सर्वेक्षणापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
घरकुल सर्वेक्षणातून वंचित ठेवल्याचा आरोप
वरखेडसह तालुक्यातील विविध गावांमध्ये अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या सर्वेक्षणात सहभागी करून घेतले नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. स्वतःच्या नावावर जागा नसल्याचे कारण देत काही पात्र लाभार्थ्यांना घरकुलाच्या लाभापासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जागा नियमित करण्याबाबतचे प्रस्ताव प्रलंबित असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून पात्र रहिवाशांच्या अतिक्रमणाबाबत नियमानुसार तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
अतिक्रमण नियमित करून घरकुलाचा लाभ देण्याची मागणी
शासकीय जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या पात्र नागरिकांच्या जागांबाबत प्रस्ताव तातडीने पुढे पाठवून, नियमानुसार जागा त्यांच्या नावावर करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी रिपाइंच्या वतीने करण्यात आली.
या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
पदाधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती
यावेळी रिपाइं आठवले गटाचे तालुकाध्यक्ष खेडकर आण्णा, प्रीतम सोनवणे, दिलीप शिरसाठ, पंकज वावडे, मुकेश शिरसाठ, संदीप शिरसाठ, अजय शिंदे, साहेबराव पवार, विकी शिरसाठ, विजय गायकवाड, दिनेश पवार, विनोद पवार, संजय गायकवाड, राजू मोरे, रमेश मोरे, महेंद्र शिरसाठ, दीपक शिरसाठ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व वरखेड येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
