Spread the love

पाचोरा शहरातील चांदसी दवाखाना सिल; वैद्यकीय पदवी व आवश्यक कागदपत्रे आढळली नसल्याची माहिती

बोगस डॉक्टर शोध समितीची कारवाई; आरोग्य विभागाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर तपासणी

पाचोरा | प्रतिनिधी

पाचोरा शहरातील शिवाजी नगर भागात सुरू असलेल्या चांदसी दवाखान्याबाबत आरोग्य विभागाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर बोगस डॉक्टर शोध समितीने तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित व्यक्तीकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली पदवी अथवा कागदपत्रे आढळून आली नसल्याचे आरोग्य विभागाच्या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

त्यानुसार शिवाजी नगर, पाचोरा येथील श्री. अमित मंडल यांच्या चांदसी दवाखान्यावर मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी सील करण्याची कारवाई करण्यात आली.

बोगस डॉक्टर शोध समितीची कारवाई

आरोग्य विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पाचोरा शहर बोगस डॉक्टर शोध समितीने संबंधित दवाखान्याची तपासणी केली. तपासणीअंती वैद्यकीय व्यवसाय करण्यासंदर्भातील आवश्यक शैक्षणिक पदवी किंवा कागदपत्रे आढळून न आल्याने दवाखाना सील करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

ही कारवाई ग्रामीण रुग्णालय, पाचोरा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश टाक तसेच बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष तथा मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी ग्रामीण रुग्णालय, पाचोरा आणि नगरपरिषद, पाचोरा येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आरोग्य विभागाच्या या कारवाईमुळे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक पात्रता व परवानग्यांशिवाय उपचार करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कारवाईचा इशारा दिला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version