Spread the love

सोयगावच्या वीजपुरवठ्याला मिळणार बळ; २५ नवीन रोहित्रांचा पुरवठा सुरू

आमदार अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्याला यश; आणखी ३०० रोहित्रांची मागणी, १०० व ३०० केव्हीए क्षमतेची रोहित्रेही मंजूर

सोयगाव | प्रतिनिधी : सोयगाव तालुक्यातील वीजपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने महावितरणकडून सोयगाव तालुक्यासाठी नवीन वितरण रोहित्रे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात १०० केव्हीए क्षमतेची २५ नवीन रोहित्रे तातडीने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयाने १७ ऑगस्ट २०२६ रोजी पत्राद्वारे याबाबत माहिती दिली आहे. तालुक्यातील वीजपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने या रोहित्रांचा उपयोग केला जाणार आहे.

४०० रोहित्रांची मागणी; पहिल्या टप्प्यात २५ उपलब्ध

आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोयगाव तालुक्यासाठी १०० केव्हीए क्षमतेची आणखी ३०० नवीन रोहित्रे उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार एकूण ४०० रोहित्रांच्या नियोजनातून पहिल्या टप्प्यात २५ रोहित्रांचा पुरवठा सुरू झाला आहे.

याशिवाय १०० केव्हीए क्षमतेचे १ रोहित्र आणि ३०० केव्हीए क्षमतेची २ रोहित्रे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे तालुक्यातील वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

कमी दाब व खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येपासून दिलासा

‘निरंतर वीज’ योजनेअंतर्गत ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, यासाठी जुनी वीज रोहित्रे बदलणे, खराब रोहित्रांची दुरुस्ती करणे तसेच आवश्यक ठिकाणी नवीन रोहित्रे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

नवीन रोहित्रांमुळे तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना कमी दाब तसेच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः शेतीपंपांसाठी स्थिर वीजपुरवठा उपलब्ध होण्यास या उपाययोजनांचा फायदा होणार आहे.

“विकसित सोयगाव | सक्षम वीजपुरवठा | समृद्ध तालुका” अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version