मिथुन ढिवरे यांच्या रविवारी ‘जनमाणसांतील तुकोबा भाग दोन’ पुस्तकाचे प्रकाशन
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या निवडक अभंगांचे निरूपणपर स्पष्टीकरण; साहित्यिका अस्मिता मेश्राम यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव प्रतिनिधी जगदिश सपकाळे : येथील साहित्यिक मिथुन ढिवरे यांच्या लेखणीतून साकारलेले ‘जनमाणसांतील तुकोबा भाग दोन’ हे सहावे पुस्तक येत्या रविवारी, २३ ऑगस्ट २०२६ रोजी प्रकाशित होणार आहे. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या निवडक अभंगांचे निरूपणपर स्पष्टीकरण या पुस्तकात करण्यात आले आहे.
मिथुन ढिवरे यांच्या ‘जनमाणसांतील तुकोबा भाग एक’ या पुस्तकाचे प्रकाशन गेल्या वर्षी मार्च महिन्यात झाले होते. या पुस्तकाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता ‘जनमाणसांतील तुकोबा भाग दोन’ वाचकांच्या भेटीला येत आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा
पुस्तक प्रकाशन सोहळा रविवार, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत ऑर्बिट क्लासेस, गिरणा टाकी रोड, पोस्टल कॉलनीच्या मागे, लक्ष्मीनगर, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन साहित्यिका अस्मिता मेश्राम ‘पुष्पांजली’, भंडारा यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे ह.भ.प. दीपक महाराज पाटील शेळगावकर तसेच अथर्व पब्लिकेशन्सचे प्रकाशक युवराज माळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धांडे फाउंडेशनचे संचालक नेमीवंत धांडे सर राहणार आहेत.
वाचक व पुस्तकप्रेमींना उपस्थितीचे आवाहन
संत तुकाराम महाराजांच्या अभंगविचारांचा आणि भक्तिपर साहित्याचा वाचकांना परिचय करून देणाऱ्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास जळगाव जिल्ह्यातील तसेच शहरातील वाचक, साहित्यप्रेमी आणि पुस्तकप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लेखक तथा साहित्यिक मिथुन ढिवरे यांनी केले आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांना एक पुस्तक तसेच चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
