Spread the love

पिण्याच्या पाण्यासाठी चिमुकल्यांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा; कापडणेत ठिय्या आंदोलन

धनुर ते कापडणे तीन किलोमीटर पायपीट; अधिकारी-लोकप्रतिनिधी अनुपस्थित, विद्यार्थ्यांसह पालकांचा संताप

कापडणे, ता. धुळे | प्रतिनिधी : पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून धनुर जिल्हा परिषद शाळेतील चिमुकले विद्यार्थी आक्रमक झाले असून, त्यांनी थेट कापडणे ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. महापुरुषांच्या प्रतिमा हातात घेऊन विद्यार्थ्यांनी धनुर ते कापडणे अशी सुमारे तीन किलोमीटर पायपीट केली. ग्रामपंचायत कार्यालयात अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याने विद्यार्थी आणि पालकांनी ग्रामपंचायत आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले.

गेल्या अनेक वर्षांपासून धनुर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पाण्याच्या प्रश्नाबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही तो सोडविण्यात आला नसल्याने अखेर विद्यार्थ्यांनीच आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

महापुरुषांच्या प्रतिमा हातात घेऊन तीन किलोमीटर पायपीट

पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या प्रतिमा हातात घेत धनुर येथून कापडणे ग्रामपंचायतीपर्यंत मोर्चा काढला. सुमारे तीन किलोमीटर अंतर पायी चालत विद्यार्थी ग्रामपंचायतीच्या आवारात पोहोचले.

मात्र, आंदोलनस्थळी ग्रामपंचायत प्रशासनातील अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी ग्रामपंचायत आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले. दीड तासाहून अधिक काळ विद्यार्थी व पालक आंदोलनस्थळी बसून असल्याचे सांगण्यात आले.

‘पाणी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच’

शाळेतील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा म्हणून पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने पालकांमध्येही तीव्र नाराजी आहे.

“जोपर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार,” असा इशारा विद्यार्थी आणि पालकांनी प्रशासनाला दिला आहे.

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थेट ग्रामपंचायतीवर मोर्चा काढल्याने प्रशासन या प्रश्नाची कितपत दखल घेते आणि धनुर जिल्हा परिषद शाळेतील पिण्याच्या पाण्याची समस्या कधी सुटते, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version