Spread the love

मनपाच्या प्रवेशद्वारावरील टोकदार गतिरोधकामुळे नागरिक संतप्त; रोषानंतर गतिरोधकात बदल

एकेरी वाहतुकीचा प्रयोग ठरला अडचणीचा; वाहनांचे टायर फुटल्याच्या तक्रारीनंतर महापालिका प्रशासनाची तातडीची कार्यवाही

धुळे | प्रतिनिधी : धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर प्रशासनाने एकेरी वाहतूक सुलभ करण्याच्या उद्देशाने बसविलेल्या टोकदार गतिरोधकामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. वाहनचालकांचे टायर फुटण्यासह अपघाताचा धोका निर्माण होत असल्याने नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेऊन अखेर महानगरपालिका प्रशासनाने संबंधित गतिरोधकात तातडीने बदल केला.

एकेरी वाहतुकीसाठी केला होता प्रयोग

महानगरपालिकेत प्रवेश करणाऱ्या वाहनांना नेहमीच्या मार्गाऐवजी दुसऱ्या प्रवेशद्वारातून प्रवेश करता यावा आणि परिसरातील वाहतूक सुरळीत व्हावी, या उद्देशाने प्रशासनाने प्रवेशद्वारावर टोकदार स्वरूपाचे गतिरोधक व अडथळे बसविले होते.

मात्र, या अडथळ्यांमुळे वाहनचालकांना त्रास होऊ लागला. विशेषतः टोकदार गतिरोधकामुळे काही वाहनांचे टायर फुटल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या. त्यामुळे वाहनचालकांसह महापालिकेत येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता.

नागरिकांच्या संतापानंतर प्रशासनाची कार्यवाही

गतिरोधकामुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत नागरिकांनी आक्षेप घेत टोकदार गतिरोधक तातडीने हटविण्याची मागणी केली. नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने तत्काळ संबंधित गतिरोधकाच्या रचनेत बदल केला.

गतिरोधकात बदल केल्यानंतर नागरिकांना होणारा त्रास कमी झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. वाहतूक नियोजन करताना नागरिकांची सुरक्षितता आणि सोय लक्षात घेणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.

“वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयोग चांगला असला, तरी नागरिकांना त्रासदायक ठरणारे अडथळे निर्माण होऊ नयेत. नागरिकांच्या रोषानंतर प्रशासनाने गतिरोधकात तातडीने बदल केला, ही समाधानाची बाब आहे,” असे सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र गायकवाड यांनी सांगितले.

देवेंद्र गायकवाड – सामाजिक कार्यकर्ते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version