Spread the love

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे सचिन काळभोर यांचे निवेदन; पक्षांतर्गत मनमानीला आळा घालण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड शहरातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत कारभारावरून आता पक्षांतर्गतच नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना निवेदन देत पक्षातील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून महापौरांच्या कामकाजात अडथळे निर्माण केले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात प्रदेश नेतृत्वाने तातडीने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

निवेदनानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता असून, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली महापौर रवी लांडगे शहराच्या विकासासाठी काम करीत आहेत. त्यांच्या कार्यशैलीमुळे पक्षाची प्रतिमा उंचावण्यास मदत होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

मात्र, पक्षातीलच काही स्थानिक नेत्यांकडून महापौरांना अपेक्षित पद्धतीने काम करू दिले जात नसल्याचा आरोप सचिन काळभोर यांनी केला आहे. गेल्या वर्षभरात तब्बल तिसऱ्यांदा स्वतःच्याच पक्षाच्या नेत्यांकडून सभा तहकूब करण्यात आल्याचा दावा करत, या प्रकारामुळे महापौरांची नाहक मानहानी होत असून विकासकामांवरही परिणाम होत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

सत्तारूढ पक्षनेत्यांवर थेट आरोप

या संपूर्ण प्रकारामागे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे हे जबाबदार असल्याचा थेट आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. शितोळे हे जाणीवपूर्वक आणि योग्य कारणाशिवाय महापौरांच्या विकासकामांमध्ये तसेच दैनंदिन प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण करीत असल्याचे काळभोर यांनी म्हटले आहे.

पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व एकीकडे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असताना, स्थानिक पातळीवरील अशा प्रकारच्या अंतर्गत संघर्षामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असून जनतेमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रदेश नेतृत्वाकडून हस्तक्षेपाची मागणी

या प्रकरणात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वैयक्तिकरीत्या लक्ष घालून वस्तुस्थितीची दखल घ्यावी. संबंधित पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देऊन महापौरांना विनाअडथळा विकासकामे व प्रशासकीय कामकाज करण्याचे स्वातंत्र्य मिळवून द्यावे, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे. दरम्यान, या निवेदनामुळे पिंपरी-चिंचवड भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले असून, प्रदेश नेतृत्व या तक्रारीची कशी दखल घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version