भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीवर प्रल्हाद सोनवणे यांची नियुक्ती
जळगाव जिल्ह्याला प्रदेश कार्यकारिणीत प्रतिनिधित्व; भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
जळगाव | प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी व प्रभारी आमदार योगेश सागर यांनी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली.
आदिवासी समाजातील नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, युवक व महिलांना संघटनेशी जोडणे तसेच भाजपची विचारधारा आदिवासी समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रल्हाद सोनवणे यांनी केलेल्या कार्याची पक्षाने दखल घेत त्यांना प्रदेश कार्यकारिणीत संधी दिल्याचे सांगण्यात आले.
या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्याला भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीत प्रतिनिधित्व मिळाले असून, जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रल्हाद सोनवणे यांच्या नियुक्तीबद्दल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आदिवासी मोर्चा प्रदेश संयोजक ॲड. किशोर काळकर, माजी आमदार रमेशदादा पाटील, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे, आमदार नंदकिशोर महाजन, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.
प्रदेश कार्यकारिणीतील नव्या जबाबदारीच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडण्यासोबतच शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रल्हाद सोनवणे यांनी सांगितले.
