Spread the love

महात्मा फुले हायस्कूलमध्ये तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा उत्साहात संपन्न

इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय प्रथम; साळवे इंग्रजी विद्यालय द्वितीय, नांदेड हायस्कूलला तृतीय क्रमांक

धरणगाव | प्रतिनिधी : वाल्मिक पाटील :
शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव आणि शिक्षण विभाग, पंचायत समिती धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान मेळावा २०२६-२७ अंतर्गत विज्ञान नाट्य स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेचे प्रास्ताविक महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक जे. एस. पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती धरणगावचे शिक्षण विस्तार अधिकारी आर. जी. सैंदाणे होते.

यावेळी पाळधी बीटचे केंद्रप्रमुख प्रदीप जाधव आणि विज्ञान मंडळाचे तालुका समन्वयक नवनीत सपकाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

सात शाळांचा उत्स्फूर्त सहभाग

तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, साळवे हायस्कूल, नांदेड हायस्कूल, महात्मा फुले हायस्कूल, बोरगाव हायस्कूल, बा. च. भाटिया हायस्कूल साकरे आणि पिंपरी मुलींची शाळा अशा सात शाळांनी सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांनी विज्ञानविषयक विविध संकल्पना, प्रयोगशीलता आणि सामाजिक संदेश प्रभावीपणे नाट्याच्या माध्यमातून सादर केले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :

🥇 प्रथम क्रमांक – इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय
🥈 द्वितीय क्रमांक – साळवे इंग्रजी विद्यालय
🥉 तृतीय क्रमांक – नांदेड हायस्कूल
🏅 उत्तेजनार्थ – बा. च. भाटिया हायस्कूल, साकरे व महात्मा फुले हायस्कूल

स्पर्धेचे परीक्षण चित्रकला शिक्षक सुनील तायडे, समाधान कोळी आणि श्याम सपकाळे यांनी केले. विजेत्या संघांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

यावेळी विज्ञान तालुका समन्वयक नवनीत सपकाळे, विज्ञान शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात आर. जी. सैंदाणे यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान नाटिकांचे कौतुक करून सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील उपशिक्षक एस. एन. कोळी व एस. व्ही. आढावे यांनी केले, तर खान सर यांनी आभार मानले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version