Spread the love

पाणी व माती संवर्धनासाठी परभणीकर रस्त्यावर; ‘महा-वॉकेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’चा संदेश; जलसंधारणासाठी लोकसहभागाचे आवाहन

परभणी | प्रतिनिधी : रामचंद्र अन्नदाते

माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आणि जलसंधारण दिनाच्या पार्श्वभूमीवर परभणी येथे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश देत ‘महा-वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले. जलसंधारणाबाबत जनजागृती करण्याच्या या उपक्रमाला परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राज्यभरात २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन, १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिक, विशेषतः युवकांमध्ये मृद व जलसंधारणाचे महत्त्व रुजविण्याच्या उद्देशाने महा-वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयापासून कृषी विद्यापीठापर्यंत वॉकेथॉन

जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील क्रीडा संकुलापर्यंत महा-वॉकेथॉन काढण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे यांच्या हस्ते वॉकेथॉनचा शुभारंभ झाला. यावेळी महापौर सय्यद इकबाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोन्सीकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी कविराज कुचे, तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

घोषणांनी दुमदुमला परिसर

वॉकेथॉनमध्ये सहभागी नागरिकांनी हातात जलसंधारणाचे संदेश देणारे फलक घेत विविध घोषणा दिल्या. ‘पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा’, ‘माती वाचवा, पाणी वाचवा’, ‘पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल, जपुया त्याचे मोल’, ‘पाणी नाही तर विकास नाही’, ‘जलसंधारणाशिवाय पर्याय नाही’, ‘जल है तो कल है’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याची गरज

माती आणि पाणी ही अत्यंत महत्त्वाची नैसर्गिक संसाधने असून त्यांच्या संवर्धनासाठी व्यापक लोकसहभाग आवश्यक आहे. केवळ भाषणातून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून जलसंधारणाचा संदेश जनमानसात रुजविणे गरजेचे आहे. पाण्याची उपलब्धता वाढविणे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी नागरिकांनी जलसंधारण अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. पाणी अडविणे, जमिनीत जिरविणे आणि मातीची धूप रोखणे यासाठी प्रत्येकाने आपल्या परिसरातील जलस्रोत व पाणलोट क्षेत्राच्या संवर्धनात योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.

‘प्रत्येक थेंबाचे संवर्धन करा’

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनीही नागरिकांना जलसंधारण अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करून जलसमृद्ध आणि हिरवागार महाराष्ट्र घडविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

चित्ररथातूनही जनजागृती

महा-वॉकेथॉनदरम्यान चित्ररथाच्या माध्यमातून जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने ‘रील्स बनवा, बक्षीस मिळवा’ या उपक्रमाची माहिती देण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही करण्यात आले.

या उपक्रमातून जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक बांधिलकी आहे, असा प्रभावी संदेश परभणीकरांनी दिला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version