Spread the love

गिरीष गोठवाळचे नेत्रदीपक यश; NEET मध्ये VJNT प्रवर्गात महाराष्ट्रात प्रथम

७२० पैकी तब्बल ६६२ गुणांची कमाई; परदेशी राजपूत समाज संघटनेतर्फे चाळीसगावात सत्कार

भडगाव प्रतिनिधी : गणेश रावळ

वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या NEET परीक्षेत ७२० पैकी ६६२ गुण मिळवत VJNT प्रवर्गात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून चाळीसगाव येथील चि. गिरीष गोठवाळ याने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल परदेशी राजपूत समाज संघटना, जळगाव यांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.

गिरीष गोठवाळ याने आपल्या मेहनतीच्या जोरावर मिळविलेले हे यश चाळीसगावसह संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून सातत्याने केलेल्या अभ्यासाचे फळ त्याला मिळाले आहे.

या यशाबद्दल परदेशी राजपूत समाज संघटना जळगावचे जिल्हाध्यक्ष सुरेश परदेशी यांच्या हस्ते गिरीषचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सचिव विनोदसिंग परदेशी, तंटामुक्ती समिती जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. जगनसिंग परदेशी तसेच गिरीषच्या कुटुंबातील सदस्य आणि समाजबांधव उपस्थित होते.

गिरीषच्या यशाचे कौतुक करताना उपस्थितांनी त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याच्या यशामुळे समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सातत्यपूर्ण मेहनत करण्याची नवी प्रेरणा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version